आगामी विधानसभा निवडणुकीत वळसे पाटील यांना विक्रमी मताधिक्‍य मिळेल – खा. अमोल कोल्हे

सजग वेब टिम, आंबेगाव

मंचर  | “आंबेगाव तालुक्याचा शाश्वत विकास करणारे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या मागे जनता ठामपणे उभी आहे. तालुक्याचा उमेदवार असूनही मला आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून जनतेने मताधिक्‍य दिले. याचा राग मनात धरून, लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा विधानसभेला आंबेगावमध्ये वचपा काढू, अशी गर्वाची भाषा विरोधकांकडून वापरली जात आहे.

पण, मी आताच लिहून देतो, की या पूर्वी झालेल्या सर्व विधानसभा निवडणुकांपेक्षा येत्या विधानसभा निवडणुकीत वळसे पाटील यांना विक्रमी मताधिक्‍य मिळवून देण्याचे काम येथील सुज्ञ जनता करणार आहे, असा विश्वास नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे श्री काळभैरवनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर झालेल्या आभार सभेत डॉ. कोल्हे बोलत होते. या वेळी दिलीप वळसे पाटील, देवेंद्र शहा, देवदत्त निकम, सुभाष मोरमारे, उषा कानडे, संतोष भोर, सरपंच संगीता शिंदे, उपसरपंच राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

डॉ. कोल्हे म्हणाले, “येत्या आठवड्यात अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेऊन शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना योग्य मोबदला देऊन बाह्यवळणाची कामे मार्गी लावण्यासाठी चर्चा केली जाईल. वाहतूक कोंडीचा प्रश्नही सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक तालुक्‍यात जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी दिल्या जाणाऱ्या वेळेचे नियोजन कळविण्याची व्यवस्था केली जाईल.”

दिलीप वळसे पाटील म्हणाले, “गेली १५ वर्षे विकासकामे करण्याऐवजी पायात पाय अडकविण्याचे व निंदानालस्ती करण्याचे काम विरोधकांनी केले. तुम्हाला काय वचपा काढायचा तो काढा. माझा विश्वास जनतेवर आहे. भीमाशंकर व पराग कारखान्यांनी पुढाकार घेऊन टाकळी हाजी, पाबळ व लोणी धामणी परिसरांत गुरांच्या छावण्या सुरू करण्याचे नियोजन केले आहे.”

अवसरी खुर्द राष्ट्रवादी कॉंग्रेस व ग्रामस्थांनी दहा टन हिरवा चारा गुरांच्या छावण्यासाठी दिल्याबद्दल ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. अरुणा थोरात, सुषमा शिंदे, सचिन पानसरे, संजय वायाळ, कल्याण टेमकर, योगेश वायाळ, अंकुश लोंढे पाटील, नीलेश टेमकर यांची या वेळी भाषणे झाली. जगदीश अभंग यांनी सूत्रसंचालन केले.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat