२७ जानेवारीपासून राजगुरूनगर येथे ‘साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमाला’
राजगुरूनगर येथे साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमाला २७ जानेवारी पासून
बाबाजी पवळे, सजग वेब टिम
राजगुरूनगर | खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचालित हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात दि. २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील यांनी दिली. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, मानद सचिव हरिभाऊ सांडभोर, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील व व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षा अॅड. राजमाला बुट्टेपाटील उपस्थित होते.
आपल्या वैशिष्टयपूर्ण आयोजनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेली ही व्याख्यानमाला सकाळच्या सत्रात होत असून व्यासपीठावर फक्त वक्ता आणि समोर ७ ते ८ हजाराच्यावर विद्यार्थी व ग्रामस्थांची उपस्थिती हे या व्याख्यानमालेचे ठळक वैशिष्ट्ये असते. महाविद्यालयात प्रांगणात दररोज सकाळी १० ते ११.३० या वेळात ही सर्व व्याख्याने होणार आहेत. व्याख्यानमालेचे हे १८ वे वर्ष आहे. २७ जानेवारी रोजी सुप्रसिध्द वैज्ञानिक डॉ.सतीश ओगले हे ‘नवविज्ञान व सामाजिक बदल’ या विषयावर आपले मौलिक विचार मांडणार आहेत. २८ जानेवारीला झी मराठीवरील हास्य कलावंत प्रा.अजितकुमार कोष्टी हे ‘हसवणूक’ या विषयावर विद्यार्थ्यांना विनोदांची हास्यमेजवाणी देणार आहे. २९ जानेवारीला ख्यातनाम संगीतकार व गायक श्रीधर फडके हे ‘बाबुजींची गाणी, जीवनाची गाणी’ या विषयावर गाण्यांमधून विचार मांडणार आहेत. ३० जानेवारीला लेखक व इतिहासकार सच्चिदानंद शेवडे सावरकर ‘एक झंझावात’ या विषयावर आपले प्रेरणादायी विचार मांडणार आहेत. ३१ जानेवारीला दै. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर हे ‘भारत एक महासत्ता’ या विषयावर आपले प्रबोधनात्मक विचार मांडणार आहेत. १ फेब्रुवारीला भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे हे ‘प्रत्येक दिवस, नवा दिवस, नवी क्षितिजे’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. तर २ फेब्रुवारीला शेवटचे पुष्प ह.भ.प.निवृत्तीमहाराज देशमुख हे ‘मायबाप’ या विषयावर गुंफणार आहेत.
या व्याख्यानमालेच्या माध्यमातून महाविद्यालयात दर्जेदार व्याख्याते आणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समोर प्रेरणादायी विचार व आदर्श ठेवण्यासाठी अॅड. राजमाला बुट्टेपाटील सातत्याने प्रयत्न करीत असतात. या वर्षीही त्यांच्या प्रयत्नातून हे सर्व व्याख्याते या व्याख्यानमालेत सहभागी होत आहेत. व्याख्यानमालेच्या निमित्ताने तालुक्यातील सर्व नागरिकांनी, माजी विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेऊन व्याख्यानमालेच्या वैचारिक मेजवानीचा, शब्दमहोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a Reply