शेती कुंपण योजना मोठ्या प्रमाणात राबविणार – दत्तात्रय भरणे (वनराज्य मंत्री)

शेती कुंपण योजना मोठ्या प्रमाणात राबविणार
– दत्तात्रय भरणे (वनराज्य मंत्री)

सजग वेब टिम, मुंबई

मुंबई | वन्य प्राण्यांचा जनतेला त्रास होऊ नये यासाठी शेती कुंपण योजना मोठ्या प्रमाणात राबविणार असून शेतीच्या संरक्षणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे वन मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. वनमंत्री पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर मंत्रालयात आयोजित विभागाच्या पहिल्याच आढावा बैठकीत भरणे बोलत होते.

वनमंत्री भरणे म्हणाले, येणाऱ्या काळात वन विभाग अधिक लोकाभिमुख होण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. वन पर्यटनाला चालना देण्यासाठी विभाग प्रयत्नशील राहिल. वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या अनुषंगाने संरक्षित क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. संरक्षित क्षेत्रातील ११० गावांपैकी ६६ गावांचे पुनर्वसन झालेले आहे. उर्वरित गावांचे लवकरच पुनर्वसन करण्यात येईल. पुनर्वसित गावांना तातडीने सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. वन्यजीव विभागाकरिता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रस्ताव सादर करा, वाघाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कॉरिडॉर राखावा तसेच राज्य वन्यजीव मंडळाची तातडीने पुनर्रचना करावी, अशा सूचना वनमंत्र्यांनी यावेळी केल्या.

सामाजिक वनीकरणाचे काम अधिक गतीने करण्याची गरज असल्याचे सांगून वनमंत्री म्हणाले, वृक्षलागवड मोहिम पूर्वीप्रमाणेच सुरु राहिल. या मोहिमेत जी झाडे लावली ती जगली पाहिजेत. तरच ही मोहिम यशस्वी होऊ शकते. महसूल विभागाच्या धर्तीवर वन विभागाची दर ३ महिन्यांनी वरिष्ठ वनाधिकांऱ्याची परिषद (फॉरेस्ट कॉन्फरन्स ) आयोजित करावी, अशी सूचना त्यांनी केली. येत्या १५ दिवसात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ही परिषद आयोजित करण्यात येईल, असे ते म्हणाले.

यावेळी भरणे म्हणाले, आदिवासी क्षेत्रातील पर्यटन स्थळाच्या विकासासाठी अधिक निधीची गरज आहे. त्यासाठी आपण पाठपुरावा करु. मृद संधारण कामांसाठी तसेच पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन आणि योजना प्राधिकरण (राज्य कॅम्पा) च्या निधीत वाढ करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी वन मंत्री संजय राठोड , मुख्यमंत्र्यांचे तसेच वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक राम बाबु, प्रविण श्रीवास्तव, नितीन काकोडकर, एस. के. राव तसेच विभागाचे अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान प्रधान सचिव विकास खारगे, नितीन काकोडकर, विरेंद्र तिवारी यांनी सादरीकरणाद्वारे विभागाच्या कामाची व योजनांची माहिती मंत्री व राज्यमंत्री यांना दिली.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat