शिवसंस्कार सृष्टी जुन्नरला होणार, विरोधकांनी मागील ५ वर्षात काय केलं? – आमदार अतुल बेनके

शिवसंस्कार सृष्टी जुन्नरला होणार, विरोधकांनी मागील ५ वर्षात काय केलं? – आमदार अतुल बेनके

सजग वेब टिम, जुन्नर

नारायणगाव | गेल्या काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यात चर्चेत असलेला विषय म्हणजे शिवसृष्टी. त्यातच माजी आमदार शरद सोनवणे यांनी बारामती याठिकाणी होणारी शिवसृष्टी जुन्नर ला व्हावी या मागणीसाठी उपोषण करू असा इशारा मागील पत्रकार परिषदेत दिला. बारामतीला होणारी शिवसृष्टी हि जुन्नर तालुक्यातून तिकडे नेली असा आरोप त्यांनी या पत्रकार परिषदेत केला. शिवसृष्टीसाठी बारामती तालुक्याला १०० कोटी रु. देण्याचा निर्णय मागे घेऊन तो निधी जुन्नर ला द्यावा अशी मागणी सोनवणे यांनी यावेळी बोलताना केली.

आज मात्र याच प्रश्नावर विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले. बारामती आणि जुन्नर असा वाद घालणं बालिशपणा आहे. विरोधकांनी गेल्या पाच वर्षात काय केलं? तालुका विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झाला परंतु त्यातून कुठलाही भरघोस निधी तालुक्यात आला नाही. विकासासाठी निधी आणण्यासाठी प्रशासकीय कागदपत्रे तयार करून त्याची व्यवस्थित तयारी करून अधिकाऱ्यांपुढे मांडावी लागतात तेव्हा निधी मिळतो फक्त मागणी करून निधी मिळत नसतो.

शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून शिवसंस्कार सृष्टी होणार असून त्यासाठी व किल्ले शिवनेरी परिसर विकासासाठी अजितदादांनी २३ कोटी रु. चा निधी देखील दिला आहे. त्याच प्रमाणे शिवसृष्टी राज्यातील प्रत्येक तालुक्यात व्हावी शिवरायांच्या विचारांचा प्रसार जगभर व्हावा त्यासाठी प्रत्येक ठिकाणी शिवसृष्टी व्हावी अशी आमचीही इच्छा आहे.

अजितदादा आमच्या पक्षाचे नेते आहेत आमच्या नेत्यांविषयी चुकीची भाषा खपवून घेतली जाणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आमच्या मनात आदर आहे. ते प्रशासन चांगल्या पद्धतीने हाताळत आहेत असे यावेळी बोलताना बेनके यांनी सांगितले.

दरम्यान शिवसृष्टीच्या मुद्द्यावर येत्या काळात तालुक्यात कशा पद्धतीने राजकारण केले जाईल हे पाहणे महत्वाचे ठरेल. आमदार सोनवणे हे उपोषणाला बसणार का? बेनके यांची त्यावर काय भूमिका असेल हे येत्या काही दिवसांत पाहणे महत्वाचे ठरेल.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat