शिवनेरी किल्ल्यावर साकारणार सातवाहन आणि शिवकालीन वस्तू संग्रहालय

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर सातवाहन आणि शिवकालीन वस्तू संग्रहालय साकारणार आहे. जुन्नरची सह्याद्री गिरिभ्रमण संस्था, डेक्कन कॉलेज आणि भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सहकार्याने ते उभारण्यात येणार आहे.

जुन्नर तालुक्‍याला इ. स. पूर्व इतिहास असून, त्याची माहिती पर्यटकांना मिळत नाही. यामुळे किल्ल्यावरील अंबरखाना इमारतीमध्ये कायमस्वरूपी माहिती केंद्र आणि शिवकालीन शस्त्रास्त्र संग्रहालय उभारण्यात यावे, अशी मागणी सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने १९ फेब्रुवारी २००७ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे केली होती. संस्थेचे अध्यक्ष संजय खत्री यांनी याबाबतची माहिती दिली. या मागणीची दखल घेत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संग्रहालयाला तत्त्वतः मान्यता दिली. यानंतर भारतीय पुरातत्त्व विभागाने या इमारतीच्या संवर्धनाला सुरवात केली. मात्र, पुढे हा प्रकल्प सरकला नाही.

दरम्यान, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज्य शासन, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा आणि भारतीय पुरातत्त्व विभागाच्या महासंचालिका उषा शर्मा यांच्याशी पत्रव्यवहार केला. ‘सह्याद्री’ने डेक्कन कॉलेजला या प्रकल्पासाठी विनंती केली. यानंतर डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी शिवनेरीसह जुन्नर शहरातदेखील पुरातत्त्व वस्तू संग्रहालय उभारण्याबाबत पुढाकार घेतला. यासाठी डॉ. शिंदे यांनी जुन्नर नगर परिषदेच्या जिजामाता उद्यानातील जागेची मागणी नगर परिषदेकडे केली आहे. नगराध्यक्ष श्‍याम पांडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच ही जागा डेक्कन कॉलेजला हस्तांतर करण्याची तयारी
दर्शविली आहे.

सातवाहन आणि शिवकालीन इतिहासाच्या माहितीसाठी ‘अंबरखाना’ इमारतीमध्ये कायमस्वरूपी माहिती केंद्र आणि संग्रहालय उभारावे, अशी मागणी आम्ही २००७ पासून करीत आलोय. येत्या शिवजयंती सोहळ्यात संग्रहालयाबाबत मुख्यमंत्री सकारात्मक घोषणा करतील, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
– संजय खत्री, अध्यक्ष, सह्याद्री गिरिभ्रमण संस्था, जुन्नर

अंबरखाना ही वास्तू वापरात येऊन चांगले संग्रहालय उभारले, तर हे पर्यटकांसाठी चांगले माहिती केंद्र होईल. या प्रकल्पाच्या परवानग्या आणि निधीसाठी मी केंद्र, राज्य सरकारसह विविध विभागांशी पत्रव्यवहार करीत आहे.
– शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार

जुन्नर शहर ही सातवाहनांची पहिली राजधानी होती. या ठिकाणी रोमन आणि ग्रीक लोकांची मोठी वसाहत होती. हे डेक्कन कॉलेजच्या वतीने केलेल्या उत्खननातून समोर आले आहे. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीच्या लोकसंस्कृतीची माहिती व्हावी, यासाठी संग्रहालयासाठी आम्ही सकारात्मक आहोत.
– डॉ. वसंत शिंदे, कुलगुरू, डेक्कन कॉलेज (अभिमत विद्यापीठ)

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat