विधिमंडळातील कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी वाचन महत्वाचे – आ.अतुल बेनके
सजग वेब टिम, जुन्नर
जुन्नर |राज्यातील नवनिर्वाचित युवा आमदारांनी विधीमंडळ आणि प्रशासकीय कामकाजाचा अभ्यास करावा असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. या सल्ल्याचा गांभीर्याने विचार करून राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधान भवनातील लायब्ररी गाठून विधिमंडळातील कामकाजाचा अभ्यासही सुरू केला आहे. यात जुन्नरचे नवनिर्वाचित आमदार अतुल बेनके आणि आ. रोहित पवार हे आघाडीवर आहेत.
आमचे मार्गदर्शक शरद पवारांच्या सूचनेनुसार विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती पुस्तकांच्या माध्यमातून घेत आहोत. अर्थसंकल्पाच्या नियोजनाची माहिती तसेच ज्येष्ठ सदस्यांनी विविध विषयांवर लिहिलेली पुस्तकं सोबत घेतली आहेत. मुंबईत आल्यानंतर दोन तास तरी ग्रंथालयात वाचन करण्याचं ठरवलं आहे
– अतुल बेनके, आमदार ,जुन्नर
विधानसभेवर निवडून आलेल्या नवीन आमदारांची संख्या यावेळी मोठी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पंधरा नवीन आमदार आहेत. यांच्या माध्यमातूनच विधीमंडळाच कामकाज होणार आहे. नवनिर्वाचित आमदारांना विधिमंडळातील कामकाजाची माहिती मिळावी यासाठी नवीन आमदारांनी विधिमंडळाच्या ग्रंथालयात जाऊन आवश्यक अभ्यास करावा अशा सूचना शरद पवार यांनी दिल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीच्या बऱ्याच नवीन आमदारांनी लायब्ररीत जाऊन अभ्यास सुरू केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी विधिमंडळ कामकाजाच्या पहिल्याच दिवशी लायब्ररी गाठली. लायब्ररीचे प्रमुख बाबा वाघमारे यांची भेट घेऊन विविध विषय आणि पुस्तकांची माहिती घेतली.यावेळी बेनके यांच्यासोबत रोहित पवार देखील होते. यावेळी त्यांनी लायब्ररीत दोन तास घालावले. यादरम्यान त्यांनी राज्याच्या अर्थसंकल्प,आर्थिक नियोजनाची माहिती घेतली. यासह यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भारदे यांच्या कार्यासह विधानसभेच्या कामकाजाची माहिती घेतली.
राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्याने अनेक नवीन आमदारांना सरकारमध्ये कामकाज करण्याची संधी मिळाली आहे. सभागृहात अभ्यासपूर्ण प्रश्न कसे उपस्थित करावे, चर्चेतील सहभाग, शून्यप्रहर, लक्षवेधी, प्रश्नोत्तरे याची माहिती घेण्याचा प्रयत्न आमदार करत आहेत. त्याचप्रमाणे विधिमंडळातील ज्येष्ठ सदस्यांनी नामवंत लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांचा अभ्यास ही या आमदारांनी सुरू केला आहे.
Leave a Reply