लॉकडाऊनमध्ये थंडावलेल्या वकिली व्यवसायाला शेतीची संजीवनी
लॉकडाऊनमध्ये थंडावलेल्या वकिली व्यवसायाला शेतीची संजीवनी; वकिलाने फुलवली वांग्याची शेती
जुन्नर | जुन्नर न्यायालयात गेल्या वीस वर्षांपासून वकिली व्यवसाय करणारे अँड हेमंत भास्कर यांनी लॉक डाऊनच्या काळात वांग्याची शेती करून भरघोस उत्पादन घेतले आहे.
मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवू लागला. न्यायालयीन कामकाज संथ झाले. तातडीची कामेच फक्त सुरू राहिली.सुरवातीला महिना दीड महिना असाच गेला हळू हळू सर्व कामे ठप्प होऊ लागली पक्षकार कोर्टाकडे फिरकेनासे झाले. आहे त्या पुंजीवर उदरनिर्वाह करावा लागत असल्याने नंतर मात्र आर्थिक चणचण जाणवू लागली. नवीन काहीतरी केले पाहिजे हा विचार मनात घोळू लागला. घरी शेती होती पण व्यवसायामुळे शेतीकडे म्हणावे तसे लक्ष देणे शक्य होत नव्हते.
शेतीत उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आतेभाऊ सतीश वाव्हळ याने वांगी लावण्यास आग्रह केला . आजूबाजूला चौकशी केली तेव्हा वांग्याची मे मधील लागवड यशस्वी होत नसल्याचे सांगून भीती घातली. मात्र हेमंत भास्कर यांनी वांगी लावण्याचाच निश्चय केला. भरता mayco 112 नंबर जातीची वांगी लावण्याचे ठरविले. ६ मे ला रोपे आणली आणि 5×3 अंतरावर बेड वर ड्रीपच्या सहाय्याने तीन हजार ५०० रोपांची लागवड केली. २० जून ला पहिला तोडा झाला.मॉल कलेक्शन सेंटरला वांगी जाऊ लागली. २५ ते ३० रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. आजपर्यत सुमारे २१ टन वांगी गेली असून आठ महिनेपर्यंत उत्पादन सुरू राहील असा प्रयत्न सुरू आहे. बंधू मंगेश भास्कर, मित्र हेमंत चिखल,अनिल काशिद यांनी मार्गदर्शन केले. कुटुंबातील सर्व घटकांची मदत होत आहे. यामुळे प्रतिकूल परिस्थितीत वांग्याचे पीक घेण्यात वकील यशस्वी झाले आहेत.
वांग्यावर शेंडे आळी, फळमाशी,पांढरी माशी,फळाची सड आदी रोगांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने होतो त्यावर मात करण्यासाठी आठवड्यातून दोनदा योग्य मात्रांच्या औषध फवारणी करावी लागते, खतांचा योग्य प्रमाणात वेळोवेळी वापर करावा लागतो अभ्यासपूर्वक शेती केल्यास यश हमखास मिळते हे यानिमित्ताने स्पष्ट झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
या शेतीतून ५० ते ६० टन उत्पादन घेण्याचा मानस आहे. भरता वांगी लावू नको म्हणणारे आता अशी भरता वांगी पाहिली नव्हती असे म्हणतात तेव्हा मनाला वेगळा आनंद होतो. लॉक डाउनमुळे थंडावलेल्या वकिली व्यवसायाला शेतीच्या रूपाने संजीवनी देण्याचा अँड हेमंत भास्कर यांचा हा प्रयोग पहाण्यासाठी शेतकऱ्यांबरोबर वकील देखील आवर्जून येतात.
Leave a Reply