राज्यात सहकारी संस्थांमार्फत २ हजार पेक्षा जास्त व्यवसाय निर्मिती – सहकारमंत्री सुभाष देशमुख
मुंबई | राज्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या बळकटीकरणासाठी सहकार व पणन विभागाने सुरू केलेल्या अटल महापणन विकास अभियानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील एक हजार ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व्यवसायांची माहिती देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून 2 हजार पेक्षा जास्त व्यवसाय ग्रामीण भागात निर्माण झाले असून व्हीएसटीएफच्या गावातील विकास संस्थांच्या उद्योगवाढीवर भर देण्यात येत आहे अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
सहकार विभागामार्फत दिनांक १९ ते २९ फेब्रुवारी, २०१९ दरम्यान महाराष्ट्र ग्राम सामाजिक अभियानाची लोकसहभागातून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासंदर्भात सहकार मंत्री श्री. देशमुख यांनी आज अटल महापणन विकास अभियानांतर्गत आतापर्यंत सुरू झालेल्या व्यवसायांची माहिती जाणून घेतली.
श्री. देशमुख म्हणाले, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने स्वत:च्या योगदानातून सुमारे २ हजार २३४ शेतीपूरक व्यवसाय सुरू केले आहे. त्यात संस्थांनी शासकीय अनुदानातून नाहीतर स्वत:च्या योगदानातून ७२ कोटीपेक्षा अधिक निधीची गुंतवणूक केली असून, १९३ कोटीपेक्षा जास्त उलाढाल झाली आहे. ज्यामधून संस्थांना नफा मिळत आहे. तसेच अशा प्रकारच्या व्यवसायातून सुमारे १ हजार ९०० पेक्षा जास्त लोकांना रोजगार प्राप्त झाला आहे, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
राज्यातील गावांचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाद्वारे १ हजार गावांमध्ये लोकसहभागातून गट शेती, शिक्षण, ग्राम विद्युतीकरण, कौशल्य विकास, वृक्ष लागवड, संगणकीय साक्षरता, पक्की घरे, बालमृत्यू थांबविणे, स्वच्छता, जलसंधारण इ. कामे होणार आहे. त्यासोबत आता सदर गावातील शेतकरी बांधवांना विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, बचत गट यांच्याशी जोडण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात मार्केटींग ॲन्ड बिझनेस डेव्हलमेंट मॅनेजर ची नियुक्ती करण्यात आली असून, गावस्तरावर ग्राम परिवर्तक मार्फत हे काम अधिक गतीने पुढे नेण्यात येणार आहे.
व्हीएसटीएफ व सहकार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ ते २९ फेब्रुवारी, २०१९ दरम्यान ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील निवड १ हजार गावांमध्ये लोकसहभागातून विशेष मोहीम घेण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये नाविन्यपूर्ण व कमी गुंतवणूक आधारित व्यवसायांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. त्यात शेतीपूरक व्यवसाय, स्पायरल सेपरेटर, कॉप शॉप, टॅक्टर,आर.ओ. वॉटर एटीएम, धान्यांची खरेदी विक्री, खते, बी-बियाणे विक्री, एलईडी स्क्रिनद्वारे जाहिरात एजन्सी इत्यादी व्यवसायांचा समावेश आहे.
Leave a Reply