मुंबईचे प्रशिक्षकपद सांभाळायला आवडेल, परंतु काही अटींवर- अमोल मुजुमदार

मुंबईचे प्रशिक्षकपद सांभाळायला आवडेल, परंतु काही अटींवर- अमोल मुजुमदार

सजग वेब टिम, मुंबई

मुुंबई | अनेक वर्षे मुंबईकडून क्रिकेट खेळलेल्या अमोल मुजुमदारने मुंबई क्रिकेटमध्ये योगदान देण्याची तयारी असल्याचे भाष्य केले आहे. महास्पोर्ट्स डाॅट इनच्या (mahasports.in) फेसबुक पेजवर लाईव्ह चॅट सेशनमध्ये तो बोलत होता. यासाठी त्याने काही अटीही ठेवल्या आहेत.

मुंबईचा माजी क्रिकेटपटू अमोल मुजुमदार अनेक वर्षे मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळला आहे. अनेकदा त्याने मुंबईला रणजी ट्रॉफी जिंकून देण्यातही महत्त्वाचा वाटा उचलला. तसेच मुंबई संघाचे नेतृत्वही त्याने केले.

महास्पोर्ट्स डाॅट इनच्या (mahasports.in) फेसबुक पेजवर लाईव्ह चॅट सेशनमध्ये काही चाहत्यांनी त्याला ‘भविष्यात मुंबई संघाला कोचिंग करायची संधी मिळाली तर करशील का?’ असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना सुरुवातीला मुजुमदार म्हणाला, “जरुर काम करायला आवडेल. पण माझ्या काही अडचणी आहेत त्या सोडवल्या तर माझे दिलोजान मुंबईसाठी हाजिर असेल.”

“माझ्या डोक्यात या संघासाठी काही कल्पना आहेत. मला जर मुंबई क्रिकेट संघटना स्वातंत्र्य देणार असेल तर मला हे काम करायला नक्कीच आवडेल. मी या सेशनमध्ये सांगु इच्छितो की मला काम करताना मध्ये कुणी आडकाठी घालता कामा नये. प्रशासनाने टांग अडवायची नाही, एवढीच माझी अट आहे.” असे तो पुढे म्हणाला.

१९९३ -९४ च्या मोसमात मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या मुजुमदारला २००८-०९ नंतर मुंबई संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर तो आसाम आणि आंध्रप्रदेशकडून क्रिकेट खेळला. त्याने त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत १७१ सामन्यात ३० शतके आणि ६० अर्धशतकांसह ४८.१३ च्या सरासरीने १११६७ धावा केल्या आहेत. सध्या मुजुमदार आयपीएलमधील राजस्थान रॉसल्सचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पहात आहे.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat