महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला हर्षवर्धन सदगीर
महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला हर्षवर्धन सदगीर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
मुंबई | महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरल्याबद्दल नाशिकचा कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच भविष्यात कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पुण्याच्या बालेवाडी स्टेडिअम येथे आज झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर याने लातूरच्या कुस्तीपटू शैलेश शेळके याचा पराभव केला.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, नाशिकच्या भगूरसारख्या ग्रामीण भागात कुस्तीचे धडे घेतलेल्या सदगीरने महाराष्ट्र केसरीची चांदीची ढाल पटकावून आपले आई-वडील आणि वस्ताद यांच्या कष्टाचे चीज केले आहे. त्याने परिश्रमाच्या बळावर मिळविलेले यश नवोदित कुस्तीपटूंना प्रेरक ठरेल. यापुढेही त्याने अशीच मेहनत घेऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करावे व राज्याचा लौकिक सर्वदूर पोहोचवावा असे म्हटले आहे.
पुण्यातील बालेवाडीत पार पडलेल्या ६३ व्या कुस्ती स्पर्धेत हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेवर ३-२ ने विजय मिळवत हा किताब पटकावला आहे. हर्षवर्धनचा विजय होताच मैदानात एकच जल्लोष करण्यात आला. हर्षवर्धननेही विजयी होताच खिलाडीवृत्तीचं दर्शन घडवत उपविजेत्या शेळकेला खांद्यावर घेऊन त्याचं अभिनंदन केलं. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हर्षवर्धनला मानाची गदा देऊन गौरविण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही पैलवान पुण्याच्या काका पवारांच्या तालमितील आहेत.
Leave a Reply