मकर संक्रांत आणि कृषी संस्कृती – राज जाधव

सजग संपादकीय

मकर संक्रांत आणि कृषी संस्कृती – राज जाधव

उत्तर भारतात या दिवशी डाळ व भात यांची खिचडी खातात आणि दान देतात त्यामुळेच तेथे संक्रातीला खिचडी संक्रांती असे म्हणतात.

भारतीय संस्कृतीचा विचार केल्यास भारतातील सण, उत्सव हे सर्व साधारणपणे कृषी संस्कृती तसेच सूर्य-कालगणना आणि चंद्र-कालगणना यावर आधारित आहेत. मकर संक्रांत हा सूर्यकालगणना यावर आधारित तसेच कृषी संस्कृतीशी निगडित असा देशभर साजरा होणारा सण.

संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण अथवा प्रवेश होणे. संक्रांती ही प्रत्येक महिन्याला येत असते, सूर्य जेंव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेंव्हा त्या पर्वास मकर संक्रांत म्हटले जाते. या संक्रमणापासून सूर्याचे उत्तरायणाला सुरुवात होते म्हणून या संक्रांतीस उत्तरायणी देखील म्हटले जाते. गृह्यसूत्रे, मस्त्यपुराण, देवीपुराण यामध्ये देखील ह्या उत्सवाचा उल्लेख आलेला आहे, सूर्यकालगणनेशी निगडित असा हा अत्यंत महत्वपूर्ण उत्सव आहे. भारतात हा सण सर्वत्र साजरा केला जातो, मकर संक्रांतीला प्रदेशपरत्वे भिन्न नावे दिसून येतात..

उत्तर भारतात या दिवशी डाळ व भात यांची खिचडी खातात आणि दान देतात त्यामुळेच तेथे संक्रातीला खिचडी संक्रांती असे म्हणतात. बंगालमध्ये यादिवशी काकवीत तीळ घालून बनलेला तिळुआ नावाचा पदार्थ, तसेच तांदळाच्या पिठात तूप-साखर घालून केलेला पिष्टक नावाचा पदार्थ खातात व वाटतात म्हणून तेथे संक्रांतीला तिळुआसंक्रांती व पिष्टक संक्रांती असे म्हणतात. तर पंजाबमध्ये या सणाला लोहडी म्हणतात यादिवशी त्या भागातील लोक आपले पारंपरिक लोकनृत्य करतात तसेच गूळ, रेवडी, भुईमूग शेंगा असे पदार्थ खातात आणि वाटतात.

दक्षिणेत याच वेळी पोंगल नावाचा तीन दिवस चालणारा उत्सव असतो. तामिळ बांधव हा सण नववर्षाचा उत्सव म्हणून साजरा करतात. माघ बिहू किंवा भोगली बिहू हा सण आसाममध्ये याच दिवशी साजरा केला जातो, हा सण पिकांच्या कापणीचे प्रतीक व त्यातून होणारे उत्पन्न या आनंदात साजरा केला जातो. महाराष्ट्रात या सणाला सकरात किंवा सुकरात म्हणतात.

महाराष्ट्रात या सणाचे खूप महत्व असून संक्रांतीच्या आदल्या दिवशी या ऋतूत उपलब्ध असलेल्या सर्व शेंंगभाज्या, फळभाज्या यांंची तिळाचे कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी तयार केली जाते. तसेच या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून अर्पण करतात. यावरून संक्रांत हा सण कृषी संस्कृतीशी देखील निगडित आहे हे स्पष्टच होते..

मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ??

– राज जाधव

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat