चित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम ; ‘प्रेमरंग’ चित्रपटात शरद गोरे यांची ऐतिहासिक कामगिरी

चित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम ;
‘प्रेमरंग’ चित्रपटात शरद गोरे यांची ऐतिहासिक कामगिरी

सजग वेब टिम

मनोरंजनातून प्रबोधनाची कास धरणाऱ्या शरद गोरे यांनी लवकरच प्रदर्शित होत असलेल्या ‘प्रेमरंग’ या चित्रपटात निर्माता, दिग्दर्शक, कथा, पटकथा, गीत, संवाद लेखन, संगीत, नृत्य दिग्दर्शन आणि अभिनय अशी चौफेर कामगिरी बजावली आहे. एकाच चित्रपटात तब्बल नऊ जबाबदाऱ्या पार पाडणे हा मराठी चित्रपटसृष्टीतील विक्रमच म्हणावा लागेल.

मूळचे साहित्यिक असणारे गोरे यांचा कलेच्या माध्यमातून मनोरंजनाद्वारे प्रबोधन करण्यावर दृढ विश्वास आहे. आगामी ‘प्रेमरंग’ हा त्यांचा रूढार्थाने रोमँटिक चित्रपट असला तरीही ‘प्रेम ही त्यागाची भावना आहे. भोगाची नाही, असा संदेश ते तरुणाईला या चित्रपटातून देऊ इच्छितात. कोकणाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात फणसासारखी वरून खडबडीत, मात्र आतून मधूर, अशी अस्सल मालवणी व्यक्तिरेखा आणि तिचे संवाद हे या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य आणि आकर्षण ठरणार आहे. या चित्रपटामध्ये विविध रसांची अनुभूती देणाऱ्या सहा गाण्यांचा समावेश आहे. त्यामध्ये शास्त्रीय, उपशास्त्रीयपासून ‘आयटम सॉंग’पर्यंत सर्व प्रकारांचे वैविध्य प्रेक्षकांना अनुभवता येईल. या चित्रपटातील गाण्यांमध्ये ‘काव्या’ला महत्व देण्यात आले असून कथेला पुढे नेतानाच एखाद्या स्वतंत्र व्यक्तिरेखेइतका प्रभाव ही गाणी निर्माण करतात. चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक स्वतः कवी असल्याने कथेत कवितेला महत्व स्वाभाविक आहे. डिजिटल क्रांतीनंतर चित्रपट निर्मितीच्या तंत्रातही आमूलाग्र बदल घडून आले आहेत. ‘प्रेमरंग’च्या निर्मितीतही उच्च तंत्रज्ञानाचा वापर केल्याने आशयाने समृद्ध असलेला हा चित्रपट नेत्रसुखदही ठरणार आहे.

निर्माता म्हणून गोरे यांचा हा पहिला चित्रपट असला तरी त्यांनी यापूर्वी रणांगण, उष:काल या चित्रपटासह सत्यांकुर, अन्नदान की पिंडदान, महापूजेची उत्तरपूजा, पंखातलं आकाश या लघुपटांचे दिग्दर्शन केले आहे. शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या नाटकासह अनेक चित्रपट, लघुपटांसाठी गीत, संगीत, दिग्दर्शन त्यांनी केले आहे. पंखातलं आकाश या त्यांच्या पहिल्याच लघुपटाचे खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही कौतुक केले होते. उषा मंगेशकर, रवींद्र साठे अशा अनेक दिग्गजांनी त्यांच्या संगीत असलेल्या गाण्यांना स्वरसाज चढविला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्ज्वल्य इतिहास नव्या पिढीसमोर वास्तवस्वरूपात आणण्यासाठी थ्री डी माध्यमाचा वापर करून भव्य चित्रपटाची निर्मिती करण्याचे गोरे यांचे स्वप्न आहे.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat