प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; शिरूर लोकसभा लढवणार?
सजग वेब टीम
शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता
पुणे | छत्रपती संभाजी राजे मालिकामुळे चर्चेत असलेले अभिनेता अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थित कोल्हे यांचा उद्या पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. कोल्हे यांच्यासह उद्या दोन माजी आमदारांचाही राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थित मुंबईत प्रवेश होणार आहे. अमोल कोल्हे हे सध्या शिवसेनेत आहे. त्यामुळे हा शिवसेनेला धक्का मानला जात आहे.
काही दिवसांआधी पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आणि संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी बारामतीमधील गोविंद बाग इथल्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी अभिनेते अमोल कोल्हे हेदेखील त्यांच्यासोबत होते.
या दोघांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. पण ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु, आता अमोल कोल्हे राष्ट्रवादीत दाखल होणार असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
Leave a Reply