पुणे – नाशिक महामार्गावरील कामे लवकर पूर्ण करा : खा. डॉ.अमोल कोल्हे यांचा अधिकाऱ्यांना अल्टीमेटम
पुणे – नाशिक महामार्गावरील कामे लवकर पूर्ण करा : खा. डॉ.अमोल कोल्हे यांचा अधिकाऱ्यांना अल्टीमेटम
सजग वेब टिम, पुणे
पुणे, दि ०३ | पुणे -नाशिक, पुणे – नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या ही दिवसेंदिवस वाढत चालली असून यामध्ये सर्वसामान्य जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या कारणास्तव आज शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज जिल्हाधिकारी यांची भेट घेतली, वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी लवकरात लवकर चालू असलेले प्रकल्प पूर्ण करा अशा सूचना त्यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
वाहतूक कोंडीची समस्येवर खासदार कोल्हे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला होता, सोबतच चाकण या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात यावा अशी आग्रही मागणी देखील केली होती त्याच मागणी संदर्भात त्यांनी आज चालू असलेल्या कार्यवाही संदर्भात आढावा घेतला.
जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडलेल्या बैठकीला खासदार डॉ अमोल कोल्हे, शिरुर- हवेलीचे आ. अशोकबापू पवार, भूसंपादन विभागाचे समन्वयक अधिकारी सारंग कोडलकर, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस उपस्थित होते.
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्ता रुंदीकरण करावे लागणार आहे , सोबतच जमीन अधिग्रहण करण्यात आल्या आहेत व काही ठिकाणी भूसंपादन करावे लागणार आहे यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान न होऊ देता सर्वांचा विचार करून जमीन मालकांना जमिनीचा मोबदला तात्काळ द्यावा, तसेच दोन्ही मार्गावरील कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत.
नारायणगाव बायपासचे सुरू असलेले काम अंतिम टप्प्यात आले असून यामधील एक लेन लवकर सुरू करण्यात यावी अशी सूचना संबधीत ठेकेदाराला खासदारांनी केली या मार्गावरील भूसंपादनाची कामे लवकर पूर्ण झाल्यास रस्त्याचे रुंदीकरण केल्याने वाहतूक कोंडी कमी होईल, वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता भूसंपादन अधिकाऱ्यांनी व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी गतीने कामे करावीत, अशा सूचना खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी दिल्या. यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी भूसंपादन विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच शेतकरीही उपस्थित होते.
Leave a Reply