पिंपळगाव जोगे उपविभागीय कार्यालय स्थलांतरास जुन्नर तालुक्याचा विरोध
पिंपळगाव जोगे उपविभागीय कार्यालय स्थलांतरास जुन्नर तालुक्याचा विरोध.
अतुल बेनके यांचे ठिय्या आंदोलन
सजग वेब टिम, जुन्नर
आळेफाटा | पिंपळगाव जोगे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय कार्यालय हे नगर जिल्ह्यात हलविण्यात येणार आहे. सदर कार्यालय सध्या जुन्नर तालुक्यात असून या कार्यालयाच्या स्थलांतराला राष्ट्रवादी काँग्रेस ने जोरदार विरोध केला आहे. लोकप्रतिनिधी आणि शासनाने या संदर्भात पावले उचलून हा निर्णय शासनाने लवकरात लवकर मागे घ्यावा मी हे कार्यालय नगर जिल्ह्यात जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार अतुल बेनके यांनी घेतलाय. बेनके हे दुपार पासून आळेफाटा येथील छत्रपती शिवाजी चौक याठिकाणी ठिय्या आंदोलनास बसले आहेत. रात्रीचे १०.३० झालेत अनेक नेते आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली परंतु बेनके हे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत.
तालुक्याच्या पाणी वाटपात या वर्षी नियोजन शून्यतेचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. त्यावरून आधीच वातावरण गरम असताना आता या मुद्द्यावरून शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात रोष पसरला असून विविध गावच्या ग्रामपंचायतींनी, संघटनांनी या निर्णयास विरोध केला आहे.
जुन्नर च्या तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयास या विषयी चे पत्र पाठवले असून या निर्णया संदर्भात जुन्नर तालुक्याची भूमिका त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कळवली आहे. दिलीप वळसे पाटील यांनीही या निर्णया संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असल्याचे कळत आहे.
बेनके हे आपलं ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याने दिवसभर आणि रात्रीही कार्यकर्त्यांची आणि विविध नेत्यांची त्यांना भेटण्यासाठी रीघ लागली आहे. नुकत्याच काही वेळापूर्वी जि. प. सदस्य आशाताई बुचके,विघ्नहर चे संचालक संतोषनाना खैरे यांनीही बेनके यांची भेट घेतली.
Leave a Reply