निसर्ग संवर्धन शिकविणाऱ्या शिक्षण पद्धतीची गरज :डॉ राजेंद्रसिंह

निसर्ग संवर्धन शिकविणाऱ्या शिक्षण पद्धतीची गरज :डॉ राजेंद्रसिंह

‘डॉ. पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०१९’ चे वितरण

पं.वसंत गाडगीळ,डॉ.विवेक सावंत, सरफराज अहमद,जांबुवंत मनोहर,सतीश शिर्के,सतीश खाडे यांचा
जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या हस्ते सन्मान 

सजग वेब टिम, पुणे

पुणे (दि.२६)| ‘भूगर्भातील ७२ टक्के पाणी संपले आहे, देशातील २६५ जिल्हे दुष्काळी झाले आहेत ,रिझर्व्ह बँकेतील संचय कमी होत असल्याच्या काळजीपेक्षा भूगर्भातील पाण्याची ‘वॉटर बॅंक’ संपत असल्याची काळजी करण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रगती -विकासासाठी निसर्ग शोषण शिकविणाऱ्या शिक्षण प्रणाली ऐवजी निसर्ग संवर्धनावर भर देणारी शिक्षणप्रणाली आणली पाहिजे ,त्यासाठी महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युएकेशन सोसायटीने पुढाकार घ्यावा’,असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी बुधवारी पुणे याठिकाणी केले.

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि ‘प्रबोधन माध्यम’ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारया ‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान’ पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी सकाळी आझम कॅम्पस (पुणे कॅम्प) येथे जलतज्ञ डॉ राजेंद्रसिंह यांच्या हस्ते पार पडला .त्यावेळी डॉ. राजेंद्रसिंह बोलत होते. या सन्मान सोहळ्याचे हे अकरावे वर्ष आहे

पंडित वसंत गाडगीळ (संस्कृत प्रसार आणि सर्वधर्मीय सलोख्यासाठी योगदान),डॉ.विवेक सावंत(ग्रामीण भागातील रोजगारासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा वापर),सरफराज अहमद(इतिहास संशोधन),जांबुवंत मनोहर(युवक क्रांती दलाच्या माध्यमातून आंदोलनात्मक काम),सतीश शिर्के(साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकच्या माध्यमातून बालकांवर संस्कार),सतीश खाडे(ग्रामीण भागातील जलसंधारण) यां मान्यवरांना ‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान’ पारितोषिक देवून गौरविण्यात आले .

आझम कॅम्पस परिवारातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘डॉ. पी. ए. इनामदार कार्यक्षमता व गुणवत्ता सन्मान’ पारितोषिक देऊन डॉ.अनिता फ्रान्त्झ आणि शबनम शोएब सय्यद यांना गौरविण्यात आले . महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस)च्या असेंब्ली हॉलमध्ये गुरूवार, दिनांक २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम झाला.

डॉ राजेंद्र सिंह म्हणाले, ‘एकविसावे शतक हे मानवजातीसाठी आव्हानात्मक आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या रूपाने पृथ्वीला ताप आलेला आहे. हा ताप वाढत चालला आहे . दुसऱ्या बाजूला पृथ्वीच्या पोटातील पाणी संपत चालले आहे. त्याचे पुनर्भरण करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.विकास आणि प्रगती करण्याचे जे शिक्षण आताच्या शिक्षण प्रणालीत दिले जाते ,त्यातून प्रदूषण ,अतिक्रमण ,शोषण होत राहते . निसर्गाची साधन संपत्ती वापरण्याचे शिकवले जाते ,मात्र निसर्ग संवर्धनाबद्दल शिकवले जात नाही. निसर्ग संवर्धनालाच प्राधान्य देणारी शिक्षणप्रणाली आणली पाहिजे ,त्यासाठी महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युएकेशन सोसायटीने पुढाकार घ्यावा. त्यातूनच सामुहिक भवितव्य घडू शकेल .

‘पाणी बचत करणे हे धर्म ग्रंथांमध्ये सांगितलेले काम आहे. भूगर्भातील ७२ टक्के पाणी संपले आहे , देशातील २६५ जिल्हे दुष्काळी झाले आहेत ,रिझर्व्ह बँकेतील संचय कमी होत असल्याच्या काळजीपेक्षा भूगर्भातील पाण्याची ‘ वॉटर बॅंक’ संपत असल्याची काळजी करण्याची वेळ आली आहे. समाजातील अस्वस्थता आणि असंतोष वाढण्यामागे पाण्याचा साठा कमी होणे ,हेही एक कारण आहे’,असेही डॉ राजेंद्र सिंह म्हणाले.

पंडित वसंत गाडगीळ म्हणाले,’ डॉ पी ए इनामदार यांचे कार्य मोठे असून, शिक्षण क्षेत्रातील योगदानाची दखल केंद्र आणि राज्य सरकारने घेतली पाहिजे . डॉ पी ए इनामदारांच्या मार्गदर्शनखाली महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीने काश्मीरमध्येही शैक्षणिक काम सुरु केले पाहिजे.

डॉ विवेक सावंत म्हणाले,’महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशनच्या माध्यमातून टीन एजर्स ना क्लीन एजर्स आणि ग्रीन एजर्स करण्याचे काम केले जात आहे . ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून मानवजातीचे कल्याण आणि पृथ्वीची जपणूक केली पाहिजे .

सरफराज अहमद ,जांबुवंत मनोहर ,सतीश खाडे,सतीश शिर्के,डॉ अनिता फ्रान्त्झ,शबनम सय्यद यांनीही मनोगत व्यक्त केले .

‘महाराष्ट्र कॉस्मापॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हे सन्मान दिले जातात. यावर्षी डॉ.पी. ए. इनामदार यांचा ७५ वा वाढदिवस असून, सन्मानाचे अकरावे वर्ष आहे.

सन्मानचिन्ह,शाल,पुष्पगुच्छ असे या सन्मानाचे स्वरूप आहे. संयोजन समितीचे अध्यक्ष दीपक बीडकर यांनी प्रास्ताविक केले. शब्बीर फुलारी यांनी सूत्रसंचालन केले. लतीफ मगदूम यांनी आभार मानले.

यावेळी हरीश बुटले ,इरफान शेख ,संदीप बर्वे ,गौरी बीडकर,डॉ मुश्ताक मुकादम ,डॉ किरण भिसे ,वाहिद बियाबानी,डॉ शैला बुटवाला इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat