भाजप-सेनेच्या काळात शहरांची अवस्था बिकट झाली – कल्याणच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे सरकारवर शरसंधान

कल्याण | कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री म्हणाले होते की, साडेसहा हजार कोटींचा आराखडा तयार आहे. आज तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला पण एक रुपयाही आला नाही. कल्याण-डोंबिवलीकरांना आता मुख्यमंत्र्यांच्या कामाची प्रचीती आली असेल. मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खातं आहे, मात्र शहराच्या ट्रॅफिकची समस्या, पाण्याची समस्या, रस्त्यांची समस्या मुख्यमंत्र्यांना सोडवता आल्या नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कल्याण येथील परिवर्तन सभेत केली. त्यामुळेच सरकारला उलथून टाकण्याची भावना आता संपूर्ण महाराष्ट्रात रुजू लागली आहे, असे मतदेखील पाटील यांनी व्यक्त केले.

 

कल्याण-डोंबिवली या शहरांची अवस्था भयंकर आहे. आम्ही नवी मुंबई, पिंपरी चिंचवड हे शहर उभे केले. ही शहरं उत्तम बनवली, पण ठाणे, मुंबई, कल्याण-डोंबिवली या शहरांची भाजप-सेनेच्या सरकारने बिकट अवस्था करुन ठेवली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी परिवर्तन सभेत केली. कल्याण डोंबिवलीसाठी एमआयडीसीकडून पाणी घ्यावं लागत आहे. लोकांना इथे राहण्याची नीट व्यवस्था पाहिजे, रस्ते हवे, सबवे, स्कायवॉक हवे, पण भाजप सरकारने काहीच कामे केली नाहीत. लोकांचा भ्रमनिरास भाजप सरकारने केला आहे. म्हाडा, एमआयडीसी, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सिडको या संस्थांकडून समृद्धी महामार्गासाठी पैसे काढले जात आहेत. भाजपसरकार मतांवर डोळा ठेवून फक्त घोषणाबाजी करत असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.

हे वर्ष निवडणुकांचं आहे, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. २o१४ सालीसुद्धा जनतेसमोर भाजप पर्याय म्हणून कधीच नव्हती, पण भाजपने लोकांसमोर गुजरातचे खोटे विकासाचे मॉडेल उभे केले. पंतप्रधान मोदी अच्छे दिनचे सोंग घेऊन आले. म्हणून भाजप सत्तेवर आलं. देशाच्या चौकीदाराच्या मनात आले आणि त्यांनी नोटा बंद करून टाकल्या. त्या नोटाबंदीमुळे आजही लोकांना झळ सहन करावी लागत आहे. नोटाबंदी मधून सावरत नाही तोच सरकारने जीएसटी लावून व्यापारी वर्गाला उद्ध्वस्त केले. त्यामुळे आता जनता जागी झाली आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. आता परिवर्तन होण गरजेचे आहे. यासाठी आम्हाला संधी द्या. अजितदादांच्या नेतृत्वात इथले सर्व प्रश्न आम्ही मार्गी लावून असा शब्द विरोधी पक्षनेता या नात्याने देतो असे आश्वासन धनंजय मुंडे यांनी जनतेला दिले.

भाजर सरकारने जनतेच्या अपेक्षा पायदळी तुडवल्या आहेत. जनतेमध्ये निराशावादी भावना तयार झाली आहे, भाजप सरकारच्या कारभारामुळे जगात भारताची नाचक्की झाली, असा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी कल्याण येथील सभेत केला. आज बेस्ट संपाचा ७ वा दिवस आहे. आमच्या नवी मुंबईत बसचे भाडे तीस रुपये असेल तर ठाण्यात साठ आहे. थेट तीस रुपये भाजप-सेनेचे सरकार स्वताःच्या घशात घालत आहे. पण जनतेच्या मागण्यांसाठी आता लढा उभारला पाहिजे, आम्हाला अटकेची भीती नाही, गरज असेल तर आम्हाला बोलवा, आम्ही वेळेप्रसंगी स्वताःला अटक करुन घेऊ, पण जनतेच्या मागण्या मांडू, अशी हमी गणेश नाईक यांनी दिली.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat