तालुका टॅंकरमुक्‍त करण्याच्या दृष्टीने चिल्हेवाडी पाईपलाईन प्रकल्प महत्वाचा – आ.अतुल बेनके

तालुका टॅंकरमुक्‍त करण्याच्या दृष्टीने चिल्हेवाडी पाईपलाईन प्रकल्प महत्वाचा – आ. अतुल बेनके

सजग वेब टिम, जुन्नर

जुन्नर | जुन्नर तालुक्यातील चिल्हेवाडी येथील धरण प्रकल्पातून बंदिस्त पाइपलाईन प्रकल्पाचा पहिला टप्पा तब्बल वीस वर्षांनी पूर्णत्वास जात आहे. या प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. डोमेवाडी येथे मंगळवारी माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी आमदार बाळासाहेब दांगट यांच्या हस्ते या प्रकल्पाचे जलपूजन करण्यात आले.

या प्रकल्पा अंतर्गत चिल्हेवाडी पाचघर ते बेल्हे रानमळापर्यंत सुमारे ३९ किमी भूमिगत पाईपलाईन करण्यात येत आहे. यापैकी १२.५ किमीचा पहिला टप्पा पूर्ण झालेल्या पाईपलाईनचे जलपूजन करण्यात आले. या प्रकल्पामुळे चिल्हेवाडी, पाचघर, आंबेगव्हाण, रोहोकडी, अहिनवेवाडी, ओतूर या गावांना सध्या लाभ होणार आहे.

शेतकरी हिताचे निर्णय घेऊन जलवाहिनीच्या कामाची पूर्तता करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. माजी आमदार बाळासाहेब दांगट व वल्लभशेठ बेनके साहेब यांनी या प्रकल्प उभारणीसाठी मेहनत घेतली आहे. दोघांचा राजकीय संघर्ष हा विचारांचा आणि तालुक्‍याच्या विकासाचा होता. पाण्याचा हक्‍क सर्वांचा आहे. या चिल्हेवाडी प्रकल्पामुळे तालुक्‍यातील ६ हजार ३७२ हेक्‍टर इतके जमीन क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. संपूर्ण तालुका टॅंकरमुक्‍त करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा आहे आणि हा प्रकल्प पूर्ण करण्याचा माझा मानस आहे असे प्रतिपादन आमदार अतुल बेनके यांनी यावेळी बोलताना केले आहे.

या उद्घाटनप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. संजय काळे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक परशुराम कांबळे, कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस. जे. माने, सहायक अभियंता श्रेणी १ एम. के. शिंदे, सहायक अभियंता श्रेणी २ चे डी. एम. नाईकनवरे, कनिष्ठ अभियंता सी. जी. वैद्य, इंडियन ह्युम पाईप इंडिया लि. कंपनी मुंबईचे असिस्टंट मॅनेजर एस. वाय. शेख, ओतूर, डोमेवाडी, रोहोकडी, उंब्रज, खामुंडी, पाचघर आदी गावातील मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat