जुन्नर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी; चर्चा आमदार सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाची

पुणे : आमदार शरद सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा जुन्नर तालुक्यात सुरूआहे. हे वृत्त समजल्यानंतर शिवसेनेच्या नेत्या व जुन्नर विधानसभा उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार असलेल्या आशाताई बुचके यांच्या सर्व समर्थकांनी नारायणगाव येथील विश्रामगृहावर बैठक घेऊन आमदार सोनवणे यांच्या शिवसेनाप्रवेशास विरोध दर्शविला. जर सोनवणे यांना प्रवेश दिल्यास जुन्नर तालुक्यातील सर्व पदाधकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सभापती, तसेच अनेक पदांवर काम करणाऱ्या शिवसैनिकांनी सामूहिकरीत्या आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. याबाबत वृत्तपत्र व सोशल मीडियावर जुन्नर तालुक्यात शिवसेनेत फूट पडणार, तसेच लोकसभेच्या निवडणूकीपुर्वी जुन्नर विधानसभेची उमेदवारी जाहीर करावी, अशा बातम्या आल्यानंतर जुन्नर तालुक्यातील सर्व पदाधिकारी दि. ५ मार्च रोजी मातोश्रीवर भेटण्यासाठी गेले होते.

प्रवेश दिल्यास जुन्नर तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील, असे दबावतंत्र वापरून जि. प. गटनेत्या आशाताई बुचके यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अनेक पदाधिकारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीस गेल्यानंतर या पदाधिकाऱ्यांची ठाकरे यांनी चांगलीच कानउघाडणी केल्याने या पदाधिकाऱ्यांना कोणतेही म्हणणे सादर न करताच माघारी यावे लागले. ठाकरे यांनी पदाधिकाºयांच्या राजीनाम्याच्या दबावतंत्राला दाद न दिल्याने आमदार शरद सोनवणे यांच्या शिवसेना
प्रवेशास हिरवा कंदील दिला असल्याचे मानले जात आहे. येत्या आठ दिवसांत आमदार सोनवणे यांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची दाट शक्यता असून आमदार सोनवणे यांचा प्रवेश झाला तर आशाताई बुचके यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आमदार सोनवणे यांच्या प्रवेशापूर्वी जुन्नर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाºयांना मातोश्रीवर बोलाविण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

 

जुन्नर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी
आशाताई बुचके यांनी वैयक्तिक भेट मागितली असता उद्धव ठाकरे यांनी ‘मला तुमच्याशी बोलायचे नाही, पक्षाबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत प्रथम पक्षाची माफी मागा’ असे म्हणत भेट देण्यास नकार दिला. तसेच हॉलमध्ये येऊन सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी आशाताई बुचके यांना राजीनाम्याच्या दबावतंत्रावर खडे बोल सुनविले. मीडियामार्फत आपण केलेले वक्तव्य पक्षाला अशोभनीय आहे. आपण पक्षापेक्षाही मोठ्या झाल्या आहात. तुम्ही तालुक्यात पुन्हा पत्रकार परिषद घेऊन पक्षाबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत प्रथम पक्षाची माफी मागा. त्यानंतर आपणास भेटण्यास टाईम देऊ, असे स्पष्ट केले, बेशिस्तपणा चालणार नाही, अशी तंबीही पदाधिकाऱ्यांना दिली. जुन्नर तालुक्यातून राजीनामे देण्याचे दबावतंत्र करून मातोश्रीवर गेलेल्या पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांनी हवा काढून घेतल्याने आशाताई बुचके व त्यांचे समर्थक एकाकी पडले आहेत. आमदार सोनवणे यांचा प्रवेश निश्चित असल्याचे त्यांना मिळालेल्या वागणुकीवर स्पष्ट झाल्याने आता आशाताई बुचके यांची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat