जुन्नरच्या जागेसाठी काँग्रेसही आग्रही, कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांकडे केली मागणी

जुन्नरच्या जागेसाठी काँग्रेसही आग्रही, 

कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांकडे केली मागणी

 

 

 

 सजग वेब टिम, जुन्नर

जुन्नर | पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभेच्या जागेसाठी काँग्रेसही आग्रही असून त्याबाबत कोणताही निर्णय़ झाला नाही. तरीही जुन्नरमधून राष्ट्रवादी काँग्रेसने आपलीच उमेदवारी जाहीर केल्याच्या चर्चेने आघाडीमध्ये या जागेवरून संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरम्यान, वरीष्ठ पातळीवर आघाडीत जो निर्णय़ होईल तो मान्य असेल, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर, भोर, जुन्नर, खडकवासला, इंदापूर, मावळ आणि खेड अशा सात जागांसाठी काँग्रेस आग्रही आहे. आघाडीच्या बैठकीत पुरंदर, भोर, जुन्नर या जागांचा तिढा सुटला आणि त्या जागा काँग्रेसकडे देण्यास एकमत झाल्याचे काँग्रेसने सांगितले होते. त्यामुळे काँग्रेसकडून पुरंदरमधून जिल्हाध्यक्ष संजय जगताप, भोरमधून आमदार संग्राम थोपटे आणि जुन्नरमधून सत्यशील शेरकर यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस कडून जुन्नरमधून अतुल बेनके यांना उमेदवारी जाहीर झाली असल्याची चर्चा सुरू झाली. येत्या ३ ऑक्टोबरला अर्ज भरणार असून काँग्रेसचे सत्यशील शेरकर हे उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित राहणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील जुन्नरसह अन्य ठिकाणच्या अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी काँग्रेस भवनमध्ये गर्दी केली होती. या दरम्यान जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक काल झाली. त्या बैठकीत जुन्नरची जागा काँग्रेसला मिळावी, अशी आग्रही मागणी शेरकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा काँग्रेसकडे केली. कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेसला जुन्नरची जागा द्यावी लागेल, अशा मागणीची घोषणाबाजी करण्यात आली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी कार्यकर्त्यांची समजूत घातली. ते म्हणाले, ‘जिल्हा काँग्रेसने यापूर्वी सात जागा आघाडीकडे मागितल्या होत्या. त्यापैकी पुरंदर, भोरचा प्रश्न सुटला आहे. जुन्नरची जागा आमचीच आहे. मात्र, अचानक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला उमेदवारी दिल्याचे जाहीर केल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. प्रत्यक्षात आघाडीकडून जुन्नरची जागा राष्ट्रवादीला जाहीर झाल्याची कोणतीही माहिती नाही. अद्याप वरिष्ठांकडून त्याबाबत कोणताही निर्णय़ झाला नाही. पक्षश्रेष्ठींकडून जो काही निर्णय़ येईल तो आम्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मान्य असेल. जुन्नरची जागा काँग्रेसकडे आल्यास त्यासाठी सत्यशील शेरकर यांचे नाव स्पर्धेत राहील. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकमेकांची मदत घ्यावी लागेल. त्यामुळे दोन्ही काँग्रेस कडून कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज होईल असे कोणतेही वक्तव्य करण्यात येऊ नये अशी विनंती केली.’

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat