जुन्नरच्या कोरोना संख्येची शतकाकडे वाटचाल, पिंपळगावचे मा.सरपंच कोरोना पाॅझिटिव्ह
पिंपळगाव (आर्वी) चे माजी सरपंच कोरोना चाचणी अहवालामध्ये आढळले पॉझिटिव्ह
आज जुन्नर तालुक्यामध्ये तीन जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह
सजग वेब टीम , जुन्नर
नारायणगाव | पिंपळगाव (आर्वी) चे माजी सरपंच हे देखील आज आलेल्या कोरोना चाचणी अहवालामध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत.
(वारूळवाडी ता. जुन्नर) येथे सध्या रहात असलेल्या पिंपळगाव तर्फे नारायणगाव च्या माजी प्रभारी सरपंचांच्या कोरोना चाचणी पॉझिटिव्ह अहवालामुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. वारूळवाडी ते कॉलेज महाविद्यालय या रस्त्यावर हे माजी सरपंच वास्तव्यास आहेत. मात्र त्रास जास्त जाणवू लागल्याने ते चार दिवसांपूर्वी पिंपळगाव येथील आपल्या घरी राहत होते असे समजते. त्यांच्या घरातील काही व्यक्तींचा स्वॅब यापूर्वीच टेस्टिंग साठी पाठवण्यात आला असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या माजी सरपंचांच्या संपर्कात अनेक व्यक्ती आल्या आहेत असे बोलले जात आहे. त्यांचा स्वँब टेस्टसाठी व त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी संपर्कात आलेल्या लोकांचा शोध आता प्रशासन घेत आहे.
यापूर्वीच नारायणगाव – वारूळवाडी हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. आजपासून पुढील चार दिवस पूर्ण वारूळवाडी गाव अत्यावश्यक सेवा वगळता बंद राहणार असल्याची माहिती वारूळवाडी चे उपसरपंच सचिन वारुळे यांनी दिली
या अहवालामुळे वारूळवाडी येथील कोरोना रुग्णांची संख्या दोन एवढी झाली आहे. तर नारायणगाव मध्ये एकूण पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याशिवाय आज धालेवाडी येथे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे जुन्नर तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ९१ एवढी झाली आहे यातील ५६ रुग्ण हे पूर्णपणे बरे झाले असून ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित ३२ रुग्णांवर लेण्याद्री येथील कोवीड सेंटरमध्ये तसेच इतर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अशी माहिती आरोग्य विभाग व डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली आहे.
नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी केले आहे.
Leave a Reply