जुन्नरचा आघाडीचा उमेदवार ठरला, येत्या ३ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज
जुन्नरमध्ये आघाडीचं ठरलं, बेनके हेच उमेदवार
जागावाटपात जुन्नर राष्ट्रवादी कडे
सजग वेब टिम, जुन्नर
नारायणगाव 😐 “विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ची आघाडी झाली आहे. जागा वाटपामध्ये जुन्नर विधानसभा हा मतदारसंघ राष्ट्रवादी कडे आला असल्याची माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्यानुसार ३ ऑक्टोबर रोजी आघाडीच्या सर्व नेत्यांना बरोबर घेऊन मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे,” अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी दिली आहे.
पिंपळगावजोगे पाटबंधारे उपविभाग कार्यालय हस्तांतराविरोधात बेनके यांनी आळेफाटा (ता. जुन्नर) येथे आंदोलन केले होते. बेनके हे १३ दिवसांच्या आंदोलनानंतर काल सकाळी नारायणगाव येथील त्यांच्या निवासस्थानी आले होते. त्या वेळी कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. या स्वागतानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
जुन्नर मतदारसंघ काँग्रेस ला द्या अशी मागणी काही काँग्रेस च्या नेत्यांनी याआधी केली होती आणि अशी चर्चाही काँग्रेस च्या नेत्यांमध्ये होती. या पक्षाच्या नेत्यांनी विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना तयारीही करण्यास सांगितले होते. शेरकर यांनीही कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू केल्या होत्या.
या वेळी बोलताना बेनके म्हणाले, “”मी धरणग्रस्त असल्याने शेतकरी प्रश्नांची मला जाण आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी मी हे आंदोलन केले. जुन्नर तालुक्यातील शेतकरी, विविध पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे सरकारला झुकावे लागले. विधानसभा निवडणुकीत जुन्नर तालुक्याच्या समस्त जुन्नरकरांच्या हितासाठीची दुसरी लढाई लढण्यास मी सक्षम आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार मी ३ ऑक्टो. रोजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, मार्गदर्शक संजय काळे, तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. नियोजनासाठी बुधवारी (ता. २५) जिल्हाध्यक्ष गारटकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची नारायणगाव येथे बैठक होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
Leave a Reply