जीवन समृद्ध करणाऱ्या शिक्षणाची गरज – नितीन गोडसे; राज्यस्तरीय चर्चासत्र हुतात्मा राजगुरू महाविद्यालय
राजगुरू महाविद्यालयात दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन
बाबाजी पवळे, राजगुरूनगर (सजग वेब टीम)
राजगुरूनगर | आपल्याकडे प्रचंड प्रमाणात नवयुवक करियरसाठी उपलब्ध होत असून त्यांचे समाधान करणारी साधनसंपत्ती उपलब्ध नाही तसेच राजकीय नेतृत्वात तशी इच्छाशक्ती दिसत नाही त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आपले जीवन समृद्ध करणाऱ्या, आपल्या जाणिवा विकसित करणाऱ्या शिक्षणाची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील एक्सेल गॅस अॅन्ड इक्युपमेंट प्रा.लि. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नितीन गोडसे यांनी केले. ते गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि हुतात्मा राजगुरू महाविद्यालय यांच्या वतीने ८ व ९ फेब्रुवारी रोजी आयोजित उद्योजकता व नेतृत्व विकासात उच्चशिक्षणाची भूमिका या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्राच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील होते. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, संचालक शांताराम घुमटकर, बाळासाहेब सांडभोर, अॅड.माणिक पाटोळे, मुरलीधर खांगटे, प्राचार्य डॉ. एस.बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. एच. एम.जरे, डॉ.व्ही.डी.कुलकर्णी, प्रबंधक कैलास पाचारणे,भैरू चौगले आणि विविध महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
नितीन गोडसे पुढे म्हणाले की आज पारंपरिक शिक्षणातून जीवन व्यतीत करण्याचा मार्ग सुलभ राहिला नाही. या रूळलेल्या मार्गावर जाऊन जीवनात यशस्वी होता येणार नाही. हे प्रचंड स्पर्धेचे युग असून जे सक्षम आहेत तेच टिकणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यानी पारंपरिक शिक्षणाबरोबर कौशल्याभिमुख शिक्षणाचा विचार करायला हवा. त्यासाठी सर्वोत्तम शिक्षण घ्या. स्वत:वर विश्वास ठेवा. स्वत:चा आदर करा. पूर्ण क्षमतेने काम करा. कामातून समाधान शोधा आणि यातून चांगली कार्यसंस्कृती निर्माण करा असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतात अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील म्हणाले की माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील बदलांनी जीवनाची सर्व क्षेत्रे व्यापली आहेत. ओला, उबर सारख्या कंपन्या केवळ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व फूड डिलिवरी क्षेत्रात सहभाग घेऊन रोजगार व महसूल निर्मितीत आपले योगदान देत आहेत. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणात व व्यवसायातही व्हायला हवा. सद्या समाजात लोकांच्या हाताला काम देणारा उद्योजक निर्माण होण्याची गरज आहे. बदलत्या काळात कौशल्याधारित शिक्षणाला महत्त्व आले असूनविद्यापीठीय अभ्यासक्रम हा कौशल्याभिमुख असायला हवा. पदवी मिळाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला एखादे कौशल्य तरी प्राप्त झाले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आजूबाजूच्या समस्यांकडे संधी म्हणून पाहताना त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तर उद्योजक म्हणून त्यांना वेगळ्या प्रकारची ओळख निर्माण होऊ शकते असे ते म्हणाले.
या चर्चासत्रात शिवाजी विद्यापीठातील डॉ.ए.डी.जाधव, मुंबई विद्यापीठातील प्रा. मनोज सुपेकर, पुणे विद्यापीठातील डॉ.एम.जी.मुल्ला, डॉ.एम.आर.अवघडे, औरंगाबाद विद्यापीठातील डॉ. सईद अजरुद्दिन, डॉ. नंदकुमार राठी यांनी मार्गदर्शन केले.
चर्चासत्राचा समारोप उपप्राचार्य डॉ. एच.एम.जरे डॉ.टी.जी.गिते, डॉ.व्ही.डी.कुलकर्णी, डॉ.सूर्यवंशी, डॉ.राजेंद्र शिरसी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या चर्चासत्रात सहभागी झालेल्या सुमारे ६० संशोधकांच्या शोधनिबंधाचा समावेश असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या चर्चासत्राचे आयोजन उपप्राचार्य डॉ. एच. एम. जरे, समन्वयक प्रा. गणेश.धुमाळ,सहसमन्वयक प्रा. ए. एस.पवार यांनी केले. समिती सदस्य म्हणून प्रा.पी.पी.ओसवाल, प्रा.एस.ए.वीर, प्रा.टी.बी.वेहळे,प्रा.आर.एन. कातोरे, प्रा.एच.एस.चौधरी, प्रा.सुर्वे, प्रा.अभिजित बेंडाले, प्रा. सचिन गायकवाड, प्रा.मीनल बोगाडे, प्रा. रवींद्र मोरे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एच.एम.जरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.काजल शहा, प्रा.रसिका तांबे,यांनी तर आभार प्रा.गणेश धुमाळ यांनी मानले.
Leave a Reply