जीएमआरटी खोडद येथे दि.२८ व २९ रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

जीएमआरटी खोडद येथे दि.२८ व २९ रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

खोडद | जागतिक विज्ञान दिनानिमित्त २८ व २९ फेब्रुवारी या दोन दिवशी जुन्नर तालुक्यातील खोडद येथे जीएमआरटी प्रकल्पात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही दिवशी हे दुर्बीण केंद्र व इतर विद्यालये व महाविद्यालयातील वैज्ञानिक प्रकल्प सर्वसामान्यांना पाहण्यासाठी ( विनामूल्य ) खुले ठेवण्यात येणार आहे.विज्ञान प्रदर्शनात ४२ महाविद्यालये,३३ शाळा व २० संशोधन संस्था सहभागी होणार असून एकूण २०० प्रकल्प या प्रदर्शनात पहायला मिळतील, अशी माहिती विज्ञान दिन समितीचे अध्यक्ष प्रा.यशवंत गुप्ता,
जीएमआरटीचे वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ.जे.के.सोळंकी,प्रशासकीय अधिकारी अभिजीत जोंधळे यांनी दिली.

विज्ञान प्रदर्शनाच्या या आयोजनामुळे अनेक विद्यार्थांना अनेक प्रकारचे उच्च अभ्यासक्रम व करिअर बद्दल मोठ्या प्रमाणावर माहिती मिळते. या भागातील विद्यालये, महाविद्यालये व शाळांना मागील अनेक वर्षांपासून खोडद येथील जीएमआरटी प्रकल्पाकडून गणित, भौतिक, रसायन व जीवशास्त्रतील प्रकल्प प्रदर्शित करण्यासाठी विनामूल्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. या वर्षी दि. २८ व २९ फेब्रुवारी २०२० या दोन्ही दिवशी हे प्रदर्शन सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सर्वासाठी खुले असणार असल्याचे प्रशासकीय अधिकारी अभिजीत जोंधळे यांनी सांगितले.

प्रदर्शनातील प्रकल्प प्राथमिक ( ५वी ते ७ वी ), माध्यमिक ( ८ वी ते १० वी ), उच्चमाध्यमिक ( डिप्लोमा, डिग्री , बी एस सी ) आणि अभियांत्रिकी ( इंजिनियरिंग ) अशा चार गटांमध्ये विभागणी केली जाणार आहे. यातील प्रत्येक गटातील सर्वोत्कृष्ट प्रकल्पासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गटातून एक उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार असून प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या ( नोंदणीकृत ) विद्यार्थांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.

या प्रदर्शनाचे उदघाटन हैद्राबाद येथीलनॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरचे (इसरो) वैज्ञानिक शंतनू चौधरी यांचे हस्ते २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता होणार आहे, तसेच कार्यक्रमाचा समारोप २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ परिवहन अधिकारी अनिल पंतोजी उपस्थित राहणार आहेत.

या विज्ञान दिन समितीचे अध्यक्ष प्रा.यशवंत गुप्ता, संयोजक डॉ.जे.के.सोळंकी, सहसंयोजक अभिजित जोंधळे, जी.जे.शेलटन, प्रमोद पडवळ, अजी पुनातू , युवराज कांबळे, चारुदत्त कानडे, हनुमंतराव भंडारी, मंगेश सोमवंशी, गुंडीराज थोरात, मंगेश उंबरजे, ज्ञानेश्वर पवार, विनोदकुमार वर्मा, सुरेंद्र गोरील, भावेश कुणबी, दिव्य ओबेरॉय, प्रीतिष मिश्रा यांनी या विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनासाठी व व्यवस्थापनासाठी परिश्रम घेतले आहेत.

या विज्ञान प्रदर्शनात नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर (इसरो) – हैद्राबाद यांचा ‘स्पेस ऑन व्हील्स’ हा प्रकल्प विशेष आकर्षण असणार आहे, तसेच कांदा व लसूण संशोधन केंद्र, राजगुरुनगर, आघारकर अनुसंधान संस्था, पुणे,राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था ( नारी ), पुणे,आघारकर अनुसंधान संस्था – पुणे, पुणे, भारतीय उष्ण देशीय हवामान विज्ञान संस्था, पुणे, भूशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ, मॉझील्ला, इंडिया, आयुध अनुसंधान एवं विकास स्थापना ( ए आर डी ई ), पुणे,प्लाझ्मा अनुसंधान संस्था, गांधीनगर, गुजरात, विज्ञान वाहिनी यांचे प्रयोग, स्पेस ओडिसी प्लॅनेटोरिअम-अहमदनगर, फ्री सॉफ्टवेअर कम्युनिटी इंडिया, विज्ञान आश्रम – पाबळ, सी- स्काय दुर्बीण, मुंबई,आकाश मित्र मंडळ, मुंबई, पुणे जिल्ह्यातील शाळा व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे जवळपास २०० प्रकल्प या प्रदर्शनात असणार आहेत.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat