जागतिक वारसा यादीतील शिबाम शहराबद्दल…

“जाणून घेऊया जागतिक वारसा यादीतील शिबाम शहराबद्दल”

सजग पर्यटन

एखाद्या वस्तीला शहरी किंवा नागरी वस्ती म्हणुन ओळखायची आजची जी परिमाणे आहेत त्यात नगरांच्या अस्तित्वा सोबतच,तंत्रज्ञानाची प्रगती,सामाजिक स्तरीकरण किंवा आर्थिक जीवनाचा व्यापक पाया व शेतीबाह्य व्यवसायात गुंतलेली मोठी लोकसंख्या यांचा त्यात आपण समावेश करू शकतो पण हे शहरांबद्दलचे आपले आकलन जास्त करून आधुनिक काळातील शहरीकरणातून आकाराला आले आहे,प्राचीन किंवा मध्ययुगीन काळात भारतीय उपखंड व त्याच्या बाहेर पण शहरीकरणाची प्रक्रिया घडून आली होती अशाच एका पण थोड्या भिन्न शहराबद्दल बीबीसीची एक डाॅक्युमेंट्री पाहत होतो तेंव्हा पहिल्यांदा माहिती मिळाली,त्या डाॅक्यूमेंट्रीत पहिल्यांदा “शिबामचा” रेफरंस आला होता मग नेटवर माहिती वाचत गेलो आणि या शहराबद्दल एक अनामिक ओढ वाटू लागली कदाचित इतिहास आवडता विषय असावा म्हणुन किंवा या शहरातचं काहीतर ओढ लावणारं आहे त्यामुळे असेल कदाचित काही बाबी या शहराबद्दल इंटरेस्टींग वाटू
लागल्या..

१६ व्या शतकात येमेन मधे असणार्या आजच्या Hadramaut प्रांतात हे शिबाम शहर आढळते पण मानवी वस्ती या ठिकाणी इ.स. तिसर्या शतकापासून अस्तित्वात होती याचे पुरातत्वीय पुरावे पण सापडतात.हडप्पा संस्कृतीतील शहरे जशी नगरनियोजनासाठी प्रसिद्ध आहेत तसे शिबाम हे तिथं बांधलेल्या अनेक मजली मातीच्या इमारतींसाठी प्रसिध्द आहे.vertical urban construction चा अत्यंत सुंदर आणि असामान्य अविष्कार म्हणजे हे शहर आहे.आज ही या शहरात सहा सात मजली मातीच्या इमारती बांधलेल्या दिसतात लोक त्यांचा वापर करताना आढळतात. “The Manhattan of the desert” असा या शहराचा उल्लेख केला जातो.

मातीमधे सहा सात मजली इमारत बांधायची गरज का लोकांना वाटली असेल? दगडाचे बांधकाम करायचं तर दगड खाणीतून काढायला व घडवायला लोखंडी औजारे हवीत,त्यासाठी लोखंड मुबलक उपलब्ध व्हायला हवं,दगडी इमारती सहा सात मजली उभारल्या तर दगड सांधायला चुना वापरला तर ती इमारत दगडाचा सारा बोजा पेलू शकते का? दगड बांधकाम तुलनेन खर्चिक आहे तेवढी संसाधने लोकांकडे आहेत का? तसे कारागिर उपलब्ध आहेत का? या सार्याचा कदाचित कुठंतरी प्रभाव शिबामच्या मातीच्या इमारत बांधकामावर पडलेला असू शकतो.पण तरीही उपलब्ध असणार्या साधनांतून उभारलेले हे आजचे शहर पण अद्भुतच आहे.

खूप विस्तृत असं हे शहर नाही,शहराला तटबंदी केलेली आहे ती पण माती व वीटांचा वापर करून बनवलेली आहे. दाटावाटीने हे शहर वसले आहे.वीटा तयार करत असताना माती,चुना,गवत यांचा वापर करून तयार केलेल्या वीटा उन्हात सुकवून त्यांचा वापर केला जातो.घरांच्या बाह्यभागाला वारा,वाळू यांच्यापासून जी इजा पोहचते त्यासाठी दरवर्षी मातीचा इमारतींना परत परत गिलावा केला जातो.इमारत बांधताना माती आणि लाकडीचाच वापर केलेला दिसेल.इमारतीत तळमजले जनावरे आणि धान्य ठेवायला वापरले जातात,इमारतीत खालच्या मजल्यापेक्षा वरचा मजला अरूंद होत गेलेला असतो,तर काही वेळा दोन इमारती लहानशा ब्रीजसारख्या भागाने जोडलेल्या दिसतात.मातीच्या व उंच बांधकामामुळे उष्ण प्रदेशात या इमारतीत गारवा निर्माण व्हायला मदत ही होते.

मुळात या वाळवंटी कमी सुपीक प्रदेशात या शहराचा उदय झाला असेल तो कशामुळे? हे शहर काही विशिष्ठ उत्पादनासाठी प्रसिद्ध नाही किंवा आसपास खूप मोठ्याप्रमाणात सुपीक सपाट जमीन आहे व ज्यामुळे शेती पण खूप सघन केली जाते असं पण नाही किंवा हा भूभाग खूप खनिजसंपन्न आहे असं ही नाही,या शहराचा विकास होण्यामागे सर्वात महत्वाच कारण होतं ते म्हणजे व्यापार.ओमानमधून खूप मोठ्याप्रमाणात किंमती धूप/गुग्गुळ सापडतो तो प्रचंड मोठ्याप्रमाणात रोमन साम्राज्यात,इजिप्तमधे पाठवला जायचा ओमान ते भूमध्य समुद्र असा हा उंटांवरून चालणारा प्रवास २०० वगैरे दिवस चालायचा त्यातला एक व्यापारी मार्गाचा टप्पा येमेनमधून जातो आणि त्या व्यापारी मार्गावर हे शहर वसले आहे.

बदलत्या काळाबरोबर नवीन काही प्रश्न या शहरासमोर उभे आहेत.जागतिक तपमान वाढ,घरगुती पाणी वापराच्या बदलत्या पद्धती यातून शिबामच्या अस्तित्वापुढे प्रश्न उभे राहत आहेत.युनेस्कोने जागतिक वारसा यादीत पण या शहराचा सहभाग केला आहे…आज फक्त शिबाम पुरतं परत कधीतर अशाच एखाद्या विषयावर बोलू.

– शरद पाटील

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat