गांजा तस्करांवर एलसीबी व नारायणगाव पोलिसांची कारवाई
गांजा तस्करांवर एलसीबी व नारायणगाव पोलिसांची कारवाई
सजग टाईम्स न्यूज, नारायणगाव
नारायणगाव (दि.०९) | नारायणगाव पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांनी आज गांजा तस्करांवर कारवाई केली आहे. नारायणगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत मांजरवाडीजवळ हि कारवाई करण्यात आली. यामध्ये वैभव संजय राऊत वय वर्ष २३ राहणार मांजरवाडी व अभिषेक शंकर शिवले वय वर्षे २४ राहणार नारायणगाव तालुका जुन्नर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे रवींद्र मांजरे व त्यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत नारायणगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मांजरवाडी फाटा ते जाधववाडी या रोडवर मांजरवाडी गावच्या हद्दीत मनोरंजन हॉटेल समोर रोडलगत मारुती कंपनीच्या लाल रंगाच्या एम एच १४ एच झेड ७३३३ स्विफ्ट कारमध्ये लाल रंगाची पिशवीला प्लास्टिक चिकटपट्टी लावून त्याचा गोलाकार केलेला गांजाचा पुडा आढळून आला. त्यानंतर सदर इसमांना गाडीसह नारायणगाव पोलिस स्टेशन येथे आणले असता सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी सदर वाहनांची पाहणी करुन १५००० किमतीचा १२५० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून तीन लाख रुपये मारुती कंपनीची लाल रंगाची स्विफ्ट कार जप्त करण्यात आलेली आहे. या बाबत नारायणगाव पोलिस स्टेशन येथे एनडीपीएस कायद्यानुसार कलम ८ क, २० क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जगताप, पोलीस हवालदार शंकर जम, पोलीस नाईक दिपक साबळे पोलीस हवालदार तावरे यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास नारायणगाव पोलिस स्टेशनचे पो.स.इ. झिंजुर्के हे करीत आहेत.
Leave a Reply