खासदार अमोल कोल्हे यांच्या विविध शासकीय कार्यालयांमध्ये मॅरेथॉन बैठका

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विविध शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन अधिकाऱ्यांकडून घेतला कामाचा आढावा

पुणे | शिरूर चे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काल (शुक्रवारी) पुणे येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वीज वितरण, बीएसएनएल, सार्वजनिक बांधकाम विभाग, डीआरएम (रेल्वे विभाग) व सिंचन विभाग आदी विभागांना भेट देऊन त्या-त्या विभागांच्या कामाचा आढावा घेतला.
या आढावा बैठकीत पहिली बैठक रास्ता पेठेतील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महावितरण कार्यालय येथे झाली. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भेट देऊन महावितरणचे प्रमुख अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेऊन मतदारसंघातील विजेच्या समस्यांचा आढावा घेतला. शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे महावितरणमधील विविध प्रश्न सोडवण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली व विविध प्रलंबित मागण्यांसाठी व उपाय योजनांसाठी सुचना दिल्या. त्यानंतर पुणे-सातारा रोडवरील बीएसएनएल विभागाच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली. सेंट्रल बिल्डिंग मधील सार्वजनिक बांधकाम विभागाला भेट दिली.

पुणे स्टेशन येथील डीआरएम विभाग येथे पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प संदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. यांसह विविध कार्यालयांना भेट देऊन सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून शिरूर लोकसभा मतदार संघातील विविध प्रलंबित कामे, योजना, अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. या विभागांचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, माजी आमदार दिलीप मोहिते, अशोक पवार, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, मोहित ढमाले, कुसुम मांढरे, गणपतराव फुलवडे, अमित बेनके, तुषार थोरात सर्व विभागांचे वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat