‘को एक्झिस्टींग विथ कोरोना’ असा प्लॅन केंद्र सरकारने तयार करावा – खा. डॉ.अमोल कोल्हे
‘को एक्झिस्टींग विथ कोरोना’ असा प्लान केंद्र सरकारने तयार करावा – खा. डॉ.अमोल कोल्हे
सजग वेब टिम, पुणे
पुणे | लॉकडाऊन दीर्घकाळ पर्यंत थांबवणं आपल्या अर्थव्यवस्थेला, उद्योगांना, कामगार, नोकरदार आणि सर्वसामान्य जनता यापैकी कुणालाच परवडणारं नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे आपण टीबी, मलेरिया, H 1 N 1 अशा आजारांसह दैनंदिन आयुष्य जगतोय त्याच धर्तीवर ‘को एक्झिस्टींग विथ कोरोना’ असा प्लान केंद्र सरकारने तयार करावा अशी सूचना शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पथकासमवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत केली.
कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकार करीत असलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्ह्यातील खासदार, आमदार आदींसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक घेतली. या बैठकीत डॉ. कोल्हे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मुद्दे मांडून अनेक महत्त्वाच्या बाबींकडे या पथकाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, लॉकडाऊन केला आहे मात्र आपण मास टेस्टींग करत नाही हे विसंगत आहे तेव्हा मास टेस्टींग करावं अशी मागणी करून ते म्हणाले की, ‘को एक्झिस्टींग विथ कोरोना’ प्लान तयार करून प्रथम ग्रीन झोन मध्ये त्याची अंमलबजावणी तत्काळ सुरू करावी. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ऑरेंज आणि रेड झोनमध्ये हा प्लान राबवावा असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, परिचारिका यासह विविध विभागांनी आतापर्यंत अतिशय चांगली कामगिरी बजावली असून त्यामुळे कोरोना विषाणूंचा संसर्ग आटोक्यात आहे अशा शब्दांत ठामपणे बाजू मांडत डॉ. कोल्हे यांनी राज्यातील कोरोना विरोधात लढणाऱ्या सर्व यंत्रणांचे कौतुक केले.
राज्य सरकार परराज्यातून आलेल्या कामगारांची चांगली काळजी घेत आहे. त्यांना व केशरी रेशनकार्ड धारकांना धान्य पुरवीत आहे. परंतु परराज्यातून आलेल्या कामगारांना घराची ओढ लागली आहे. त्यामुळे आतापासूनच त्यांना त्यांच्या गावी परतण्यासाठी विशेष ट्रेन्सचे नियोजन करण्याची उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजितदादा पवार यांची मागणी मान्य करावी अशी सूचनाही डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय पथकाकडे केली.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय उपचार करणाऱ्या स्टाफची इंटरव्हलला नियमित तपासणी करण्यात यावी. उपचार करणारी रुग्णालये कोरोना संसर्गाची केंद्रीय बनणार नाहीत याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे सांगून डॉ. कोल्हे यांनी “टायफाईड मेरी” या बहुचर्चित घटनेप्रमाणे घडू नये अशी अपेक्षा व्यक्त करताना इटली सारख्या देशात एकाच वेळी अनेक रुग्णांलयात कोरोना रुग्णावर उपचार केले. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊन परिस्थिती अधिक गंभीर बनली याकडे केंद्रीय पथकाचे लक्ष वेधून सर्वण कोविड रुग्णालयात एकाच वेळी रुग्ण दाखल करून उपचार करण्याऐवजी एका रुग्णालयाची खाटांची क्षमता संपेपर्यंत दुसऱ्या रुग्यालयात दाखल कोरोनाचा रुग्ण दाखल करू नये अशी सूचनाही डॉ. कोल्हे यांनी केली.
आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना अतिशय अस्पष्ट (व्हेग) आहेत. त्यामुळे आयुर्वेद, युनानीसह सर्व शाखांचा ‘कंबाईन इंटिग्रेटेड मेडिकल अॅप्रोच’ केंद्र सरकारने तयार करावा अशी सूचनाही या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत आपले मुद्दे मांडताना डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय पथकाला केली.
Leave a Reply