कॉर्पोरेट ऑफिस नव्हे हे आहे सोरतापवाडीचं ग्रामपंचायत कार्यालय
कॉर्पोरेट ऑफिस नव्हे हे आहे सोरतापवाडीचं ग्रामपंचायत कार्यालय
सजग टाईम्स न्यूज, सोरतापवाडी
“खेड्याकडे चला” म्हणत महात्मा गांधींनी ग्रामीण विकासाची हाक दिली. ग्रामीण विकास या विषयावर मोठमोठ्या चर्चा होत असतात. सरकारकडून हजारो कोटी रुपयांचे पॅकेज, विविध योजना दरवर्षी ग्रामीण विकासासाठी जाहीर केल्या जातात. पण आजही भारतातील अनेक गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.
स्थानिक राजकारण, समाजकारण हे गावच्या प्रगतीच्या दृष्टीने पोषक असलं पाहिजे. गावच्या नेतृत्वाकडे ती दृष्टी पाहिजे नव्हे तर इच्छाशक्ती पाहिजे. होय इच्छाशक्ती पाहिजे अनेकांची भाषणे गाजतात पण कारकीर्द गाजत नाही त्याचे मूळ कारण म्हणजे राजकिय इच्छाशक्ती.
पुणे जिल्ह्यातही एक गाव असं आहे ज्याने गेल्या ५ वर्षात अभूतपूर्व विकास करून घेत या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. इतर गावांसाठीही या गावाची विकासनीती आदर्शवत अशी आहे. या गावाचं नाव आहे सोरतापवाडी!
पुणे-सोलापूर हायवेवर हडपसरपासून पुढे काही किमी अंतरावर वसलेलं हे गाव. दर रविवारी सातत्य ठेवून १५० हून अधिक आठवडे राबविण्यात आलेलं स्वच्छता अभियान आणि झाडांची केलेली सजावट, यामुळे गावाचं रूप आणि गावपण उठून दिसतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या दिवशी स्वच्छ भारत मिशनची घोषणा केली तेव्हापासून आजपर्यंत न चुकता प्रत्येक रविवारी या गावात सक्रिय स्वच्छता अभियान राबवले जाते.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या बाबतीतही या गावाने आदर्श घालून दिला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजवर या गावात कोरोनाचा एकही रुग्ण नाही! लक्षणे दिसल्यावर त्वरित विलगीकरण, सोशल डिस्ट्नसिंग, सॅनिटायझेशन इत्यादी उपाय करून या गावाने कोरोनाला पूर्णपणे दूर ठेवण्यात यश मिळवलं आहे.
सॅनिटायझेशन टनेल या यापैकीच एक उपक्रम. गावात प्रवेश करताना प्रत्येक व्यक्तीला या टनेलमधून जावे लागते, त्यामुळे एखाद्या व्यक्तिमार्फत बाहेरून विषाणूचे वहन होत असल्यास ते रोखले गेले. असे अनेक प्रतिबंधात्मक उपाय राबवून या गावाने कोरोना प्रादुर्भाव रोखला आहे.
या गावात नुकतीच उभारण्यात आलेली आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे ग्रामपंचायतीची डौलदार इमारत.
एखाद्या कॉर्पोरेट कंपनीच्या ऑफिसप्रमाणे या नव्या इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. संगणकीकृत प्रणाली आणि अद्ययावत सुविधांनी युक्त असलेली ही इमारत गावकऱ्यांना सर्व सुविधा देण्यासाठी तत्पर असेल.
काही दिवसांपूर्वी खासदार गिरीश बापट आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या प्रमुख उपस्थितीत या इमारतीचे उदघाटन करण्यात आले. ही अत्याधुनिक इमारत बांधताना पर्यावरणाचा काळजीपूर्वक विचार करण्यात आला आहे.
सोलर पॅनल, रेनवॉटर हार्वेस्टिंग अशा पर्यावरणपूरक गोष्टींचा समावेश यात करण्यात आला आहे. परिसरात शोभेची झाडे लावल्याने इमारत आणखी उठून दिसते. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
या कार्यालयासाठी १४वा वित्त आयोग, जिल्हा, ग्रामनिधी, जिल्हा परिषद निधी व ग्रामपंचायत निधी यांतून अंदाजे १ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
येत्या काळात गावकऱ्यांना तत्पर सुविधा देण्यासाठी हे ग्रामपंचायत कार्यालय सज्ज असणार आहे.
Leave a Reply