कुकडीच्या पाण्यासाठी अतुल बेनके आक्रमक; स्वतःच उघडले डिंभे डावा कालव्याचे गेट
नारायणगाव – कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला मुहूर्त मिळत नसल्याने पाण्यासाठी आक्रमक झालेल्या अवर्षणग्रस्त पूर्व भागातील शेतकऱ्यांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक उपाध्यक्ष अतुल बेनके, तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वाखाली डिंभे डावा कालव्याचे गेट उघडून मीना शाखा कालव्यात पाणी सोडले.
ही माहिती समजताच सुमारे अर्धा तासानंतर कुकडी पाटबंधारे विभागाने तातडीने गेट बंद केले. गेल्या पंधरा दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाण्यासाठी दोन वेळा आक्रमक भूमिका घेतली. यामुळे कुकडी पाटबंधारे विभागाने पाण्याचे नियोजन तातडीने न केल्यास पुढील काळात कुकडीच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता आहे. कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणातून रब्बीचे सुमारे साठ दिवसांचे मोठे आवर्तन सोडण्यात आले होते. या आवर्तनात चाळीस दिवसांत सुमारे सहा टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन असताना सुमारे चौदा टीएमसी पाणी सोडल्याने कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणाची पाणी पातळी खालावली आहे. रब्बीच्या आवर्तनात नियोजनाअभावी पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला असल्याचा आरोप बेनके यांनी केला आहे.
कुकडी प्रकल्पात आज अखेर ८.२७ टीएमसी (२७.१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. कुकडीच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी कालवा सल्लागार समितीची मुंबई येथे पाच फेब्रुवारी रोजी बैठक ठेवण्यात आली होती. मात्र ही बैठक ऐन वेळी रद्द करून ही बैठक चौदा किंवा पंधरा फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले. पश्चिम भागातील मीना खोऱ्यातील शेतकऱ्यांना वडज धरणातून मीना नदीत व मीना पूरक कालव्यात पाणी सोडण्यासाठी बेनके यांनी तीस जानेवारी रोजी आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन कुकडी पाटबंधारे विभागाने एक फेब्रुवारी ते सहा फेब्रुवारी २०१९ दरम्यान तातडीने पाणी सोडले होते.
पाणी टंचाईमुळे पूर्व भागातील शेतकरी त्रस्त झाल्याने सोमवारी (ता. ११) बेनके व पवार यांच्या नेतृत्वाखालील पूर्व भागातील शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता के. आर. कानडे यांची भेट घेऊन मीना शाखा कालव्यात पाणी सोडण्याची मागणी केली. कालवा सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती या वेळी कानडे यांनी दिली. या मुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी दुपारी एक वाजता बेनके, पवार यांच्या नेतृत्वाखाली डिंभा डावा कालव्याचे गेट उघडून मीना शाखा कालव्यात पाणी सोडले.
त्या नंतर दुपारी दीड वाजता पाटबंधारे विभागाने गेट पुन्हा बंद केले. अशी माहिती शाखा अभियंता प्रकाश मांडे यांनी दिली.
जलसंपदामंत्री निवडणूक कामात व्यग्र
शेतकरी हा नैसर्गिक आपत्ती, शेतमालाचे घटलेले बाजारभाव, पाणीटंचाई या समस्यांमुळे मेटाकुटीला आला आहे. मात्र निवडणुकीच्या कामात व्यग्र असलेल्या जलसंपदामंत्र्यांना कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यास मुहूर्त मिळत नाही, ही दुर्दैवी बाब आहे, असा आरोप बेनके यांनी केला.
Leave a Reply