कळमोडी योजनेसाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद व्हावी – अशोक टाव्हरे; मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
बाबाजी पवळे, राजगुरूनगर (सजग वेब टीम)
राजगुरूनगर | पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कळमोडी धरणातून प्रस्तावित असलेल्या उपसा जलसिंचन योजनेसाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद करावी अशा मागणीचे लेखी निवेदन कळमोडी पाणलोट विकास संस्थेचे अध्यक्ष अशोकराव टाव्हरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले. आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार,खेड तालुक्याच्या पुर्व भागातील कनेरसर,पुर,वरूडे,वाफगाव ही गावे व शिरुर तालुक्यातील थिटेवाडी बंधारा पाणलोट क्षेत्रातील केंदुर, पाबळ,धामारी,खैरैवाडी व इतर गावांसाठी उपसा जलसिंचन योजना प्रस्तावित आहे.खेड तालुक्यांच्या गावांचा प्रस्ताव राज्यपाल महोदयांकडे मान्यतेसाठी प्रलंबित आहे.मागील महिन्यात जलसंपदा राज्य मंत्री विजय शिवतारे साहेबांनी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची बैठक घेऊन सर्वेक्षणाबाबत आदेश दिले असून आठ महिन्यात प्रत्यक्ष निविदा व काम सुरू होईल असे सांगितले. वास्तविक सदर बैठकीतील निर्णयांना कॅबिनेट मंत्री,मुख्यमंत्री व कॅबिनेट मिटींग यांची मंजुरी आवश्यक आहे. गेली अनेक वर्षे या योजनेबाबत लोकप्रतिनिधी निवडणूका जवळ आल्यानंतर आश्वासन देत आहे.दि.25 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे.वंचित गावांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीकोनातून कळमोडी उपसा जलसिंचन योजनेसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी तसेच या योजनेसाठीचे प्रलंबित सर्व प्रस्तावांना मंजुरी देऊन कामास सुरुवात व्हावी ,अन्यथा निवडणुकीच्या धामधुमीतील मृगजळ ठरून पाणीप्रश्न कायमस्वरूपी प्रलंबितच राहिल.
Leave a Reply