ओतूर डिंगोरे भागाकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे विशेष लक्ष; ढमाले आणि आमले यांच्यात महत्वाच्या पदासाठी चुरस?
ओतूर डिंगोरे भागाकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे विशेष लक्ष; ढमाले आणि आमले यांच्यात महत्वाच्या पदासाठी चुरस?
स्वप्नील ढवळे (सजग वेब टिम, जुन्नर)
जुन्नर | जुन्नर पंचायत समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओतूर गणाचे सदस्य विशाल तांबे, तर उपसभापती पदी वारूळवाडी गणाचे सदस्य रमेश खुडे यांची निवड करण्यात आली आणि राज्यातील महाविकासआघाडीचा पॅटर्न प्रथमच जुन्नर तालुक्यात राबवला गेला.
गेल्या विधानसभा निवडणुकीत कल्याण नगर हायवे पट्ट्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता तो यावेळी भरुन काढण्यात राष्ट्रवादी ला यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत महत्वाची आघाडी ही ओतूर-पिंपरी पेंढार आणि उदापूर-डिंगोरे गट या दोन जिल्हा परिषद गटांनी दिली. त्यामुळे सभापती पदाची संधी दिल्यानंतर ही राष्ट्रवादी काँग्रेसचे या भागाकडे विशेष लक्ष आहे असं म्हणावं लागेल.
ओतूर पिंपरी पेंढार गटाचे जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले आणि उदापूर-डिंगोरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले या दोघांचेही जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये वजन वाढले आहे. ढमाले आणि आमले यांनी आपल्या संघटन कौशल्याची चुणूक विधानसभा निवडणुकीत दाखवून दिली असल्याने आता जिल्हा परिषद मध्ये या दोघांनाही महत्वाची जबाबदारी मिळणार अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये पाहायला मिळत आहे.
या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांची सोशल मीडियावर मोर्चेबांधणी सुरु केल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेत महत्वाची जबाबदारी द्यावी यासाठी दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आग्रही आहेत. कार्यकर्त्यांच्या या मागण्यांकडे पक्षनेतृत्व आता काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.
Leave a Reply