ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अंधारातच भरवला जनता दरबार
राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भररस्त्यात मंत्रालयाबाहेर अंधारातच भरवला जनता दरबार
जनतेला ताटकळत न ठेवता त्यांचे प्रश्न तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न
सजग वेब टिम, मुंबई
मुंबई दि.१६ | मंत्रीमंडळाच्या बैठकीतून वेळेत जनता दरबारात पोचता आले नाही परंतु आलेल्या जनतेला माघारी न पाठवता बैठक संपल्यानंतर मंत्रालयाच्या बाहेर अंधारातच आलेल्या लोकांचं म्हणणं आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला असून त्यांच्या तत्परतेबद्दल जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनता दरबार हा उपक्रम राज्यात यशस्वी ठरतो आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना ‘जनता दरबार’ हा उपक्रम राबविण्याच्या सुचना दिल्यानंतर राज्यातील जनता राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आपल्या समस्या घेऊन दाखल होते आहे.
बुधवारी असाच एक किस्सा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याबाबतीत घडला. ४ ते ६ या वेळेत जनता दरबारात पोचता आले नाही मात्र आलेल्या लोकांना घरी परत न पाठवता रात्री उशिरा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपले मंत्रालयीन कामकाज संपताच मंत्रालयाबाहेरील परिसरात, भरअंधारात लोकांची भेट घेतली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
सामान्य माणसाच्या प्रश्नाची सोडवणूक झाली की मनाला समाधान मिळते. शेवटी ते आहेत म्हणून आपण आहोत अशी भावना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी बोलून दाखवली.
Leave a Reply