उत्तर पुणे जिल्ह्यात दवबिंदू गोठले, पारा ५ अंशाच्या खाली
जुन्नर | उत्तरेकडून आलेल्या थंडीच्या लाटेने सध्या जुन्नर तालुकाही गोठलेला दिसत आहे. गुंजाळवाडी, सावरगाव परिसरात सकाळी पडलेल्या दवबिंदूंचे गोठून बर्फात रूपांतर झाले होते. उंब्रज परिसरातही शेतामध्ये बर्फाची चादर पाहायला मिळाली. नारायणगाव शहर परिसरात सकाळी पारा ६℃ पर्यंत उतरला होता. नागरिकांनी वाढलेल्या थंडीमुळे ऊन डोक्यावर आल्यानंतरच घराबाहेर पडण्यास सुरुवात केली आहे.
वाढत्या थंडीने द्राक्ष व पिकांवर काही परिणाम तर होणार नाही ना या चिंतेत शेतकरी मित्र दिसत आहेत. मात्र अचानक आलेल्या या थंडीच्या लाटेने जुन्नर तालुक्याचे काश्मीर झाले असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
संतोष पाचपुते, आंबेगाव
पारगाव- राज्यात सर्वत्र सध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला दिसतोय. संपुर्ण राज्यात बारमाही बागायती तालुका म्हणून ओळख असणाऱ्या आंबेगाव तालुक्यातही थंडीने चांगलेच थैमान घातले आहे. आज थंडीचे प्रमाण जास्तच वाढल्याचे दिसून आले आहे. आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव (खडकी)येथील प्रगतशील शेतकरी श्री. राहुल बांगर यांच्या उसाच्या व मकाच्या शेतात तर दवबिंदू ही गोठल्याचे समोर आले आहे. पिंपळगाव सह तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये हीच परिस्थिती पहायला मिळत आहे. पिकांवर पडलेले दव हे बर्फ सदृश्य कणात आढळुन आल्याने या परीसरात थंडीचा कडाका पाच अंशाच्या खाली गेल्याचे दिसून येत आहे. वाढत्या थंडीमुळे लोक सकाळी दहाच्या नंतरच घराबाहेर पडण्यास पसंती देत आहेत. वाढणारी थंडी ही सध्या शेतात असणाऱ्या काही पिकांसाठी पोषक असली तरी द्राक्ष बायतगतदार मात्र चिंतेत आहेत. तसेच जनावरे,लहान मुले,वृद्ध हि थंडी अपायकारक ठरु शकते असे मत वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे.
Leave a Reply