आम्ही सावित्रीच्या लेकी

आम्ही सावित्रीच्या लेकी या सदरातील आजच्या सावित्रीची लेक आहेत.
दर्शना पवार

“बाईला व्यक्ती समजा,बाईला माणूस समजा”, हा साने गुरुजींचा विचार खऱ्या अर्थाने जगणाऱ्या दर्शना ताईकड़े आज स्त्रियांच्या सबलीकरणासाठी लढा देणारं व्यक्तित्व म्हणून बघितला जातं.

तसा दर्शना ताईंचा प्रवास सुरु होतो तो एक गृहिणीपासून. पुढे आयुष्यातील येणाऱ्या प्रसंगाना तोंड देत त्यांनी स्त्रियांसाठी काम करायच ठरवलं. LIC मधे काम करताना त्यांचा संबंध प्रत्यक्ष स्त्रियांशी झाला व तिथून पुढे त्यांनी महिलांविषयी व त्यांच्या प्रश्नांविषयी पुस्तके वाचायला सुरुवात केली. या सगळ्या प्रवासात त्यांना गोपाळ नेवे व बिना जैतकर, परेश शहा यांच्याकडून प्रेरणा व साथ मिळत गेली.
याचदरम्यान, दर्शना ताईची भेट साधना साप्ताहिकात काम करताना नरेंद्र दाभोळकरांशी झाली.

Gender Equality हि खऱ्या अर्थाने जाणून उमजून घेण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तकांचं वाचन केलं, या काळात त्या साने गुरूजी स्मारकाच्या माध्यमातून सेवा दलाशी जोडल्या गेल्या. सेवा दलाच्या पंचसुत्रीवर होणारं वैचारिक काम हे महिलांशी संबंधित असू शकता,हे त्यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून सिद्ध केलं.

ग्रामीण भागातील महिलांसाठी काम करण्याची मनीषा ठेवून शहरात आलेल्या दर्शना ताई ज्ञानाचा साठा घेऊन परत गावाकडे गेल्या,तिथल्या महिलांना एकत्र करुन त्यांच्या बोलीभाषेत म्हणजे ऐरणी भाषेत त्यांच्याशी संवाद साधू लागल्या. या संवाद प्रक्रियेतूनच त्यांनी महिलांच्या प्रश्नांना हात घालायला सुरुवात केली व आज दर्शनाताई खेड्यापाडयातल्या-वाड्यावस्त्यांतल्या स्त्रियांचे प्रश्न समजून घेतायत,त्यांच्या न्याय-हक्कांसाठी लढ़ा देतायत, याचबरोबर, त्या लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार या विषयावर पण काम करत आहेत.

आज आपण कितीही संविधानावर बोलत असलो,तरी हे काम अजून तितकसं स्त्रियांपर्यंत पोहचलेलं दिसत नाही कारण, आजही स्त्रिया मनस्मृतीवर आधारित परंपरा जपत आहेत. बहुतांश ग्रामीण भागात आजही बुरसटलेल्या परंपरा पाळल्या जात आहेत, त्यामुळे शिक्षित मुलींचे ग्रामीण भागातील मुलांबरोबर लग्न करण्याचे प्रमाण कमी आहे व त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असं आवर्जून दर्शना ताई सांगतात.

यासाठी त्यांनी लिखनाच्या माध्यमातून देखील प्रबोधन करण्याचे काम केलेलं आहे, त्यांनी “साधना”, “मंथन”, “एकला चलो रे ” यामधून लेख लिहिले आहेत. त्याचबरोबर त्या Gender equality या विषयावर सध्या संवादशाळादेखील घेत आहेत.

ज्या महिलांनी सासरच्या अत्याचाराला विरोध करुन घर सोडलं त्यांना माहेराने पण नंतर आपलंसं केलं नाही, अशा माहिँलांसाठी “माझं घर” साकारु इच्छिणाऱ्या, महिलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या वैचारिक बैठकीसाठी काम करणाऱ्या, पितृसत्ताक संस्कृती विरोधात आवाज उठावणाऱ्या या सावित्रीच्या लेकीला लोकसंस्थेचा मानाचा मुजरा व त्यांच्या कार्याला शुभेच्छा ?

-स्नेहल डोके-पाटील

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat