आमदार बेनके यांनी घेतला चिल्हेवाडी पाईपलाईन प्रकल्पाचा आढावा
आमदार बेनके यांनी घेतला चिल्हेवाडी पाईपलाईन प्रकल्पाचा आढावा
सजग वेब टिम, जुन्नर
नारायणगाव दि.२० | जुन्नर तालुक्याच्या उत्तर पूर्व भागातील कृषी सिंचनाच्या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प म्हणजे चिल्हेवाडी पाईपलाईन प्रकल्प. आमदार अतुल बेनके यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात हा प्रकल्प पूर्ण करू आणि तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात शेतकऱ्यांना पाण्याच्या प्रश्नी दिलासा देऊ असा शब्द निवडणुकीत दिला होता.
याचपार्श्वभूमीवर या चिल्हेवाडी धरण बंदपाईपलाईन प्रकल्पाचा बेनके यांनी अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
चिल्हेवाडी पाचघरचा प्रकल्प हा माजी आमदार वल्लभ बेनके यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता, हा प्रकल्प आपण प्राधान्याने पूर्ण करणार आणि लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतात थेट पाणी पोहचवणार असे बेनके यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सदर पाईपलाईनच्या कामाच्या संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत तसेच जि. प. सदस्य पांडुरंग पवार साहेब यांच्यासह बैठक घेऊन बेनके यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला.
या बैठकीत आमदार बेनके यांनी प्रकल्पाची सखोल माहिती घेतली. कामाची सध्याची स्थिती, धरणालगतचे पाण्याचे पाईपलाईन मधून पाण्याचा होणारा विसर्ग व शेवटच्या टोकापर्यंत मिळणारे पाणी, एकूण वितरिका, लाभक्षेत्रातील गावांसाठी मिळणारं पाणी, आवर्तनाचा कालावधी, भिजणारं लाभक्षेत्र, प्रलंबित काम पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी या सर्वच बाबींचा अाढावा काल आमदार बेनके यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला.
नारायणगाव याठिकाणी झालेल्या या बैठकीत अशोकनाना घोडके, प्रदीपजी पिंगट, विजय कुऱ्हाडे, जयरामशेठ भुजबळ, रानमळा गावचे माजी सरपंच सुरेश तिकोणे , मयुर मनोहर गुंजाळ, पंढरी गुंजाळ माजी (शाखा अभियंता जलसिंचन) आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply