आदिवासींचे जीवनमान दर्जात्मक व्हावे यासाठी प्रयत्नशील – विवेक पंडित
पालघर जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी आणि सर्व शासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक
पालघर | आदिवासी क्षेत्र आढावा समिती महाराष्ट्र अध्यक्ष विवेक पंडित (राज्यमंत्री) यांचा पालघर जिल्हा शासकीय दौरा आजपासून सुरू झाला. सकाळी शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीनंतर 11 ते दु. 4 पर्यंत विवेक पंडित यांनी तब्बल 5 तास पालघर जिल्ह्यातील सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांचा आदिवासींशी संबंधित सर्व शासकीय योजना आणि धोरणांचा आढावा घेतला. यावेळी पालघर जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे,मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आदिवासींचे जीवनमान दर्जात्मक असायला हवे अशी अपेक्षा यावेळी पंडित यांनी व्यक्त केली . आपल्या जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी युवती युवक या स्पर्धात्मक युगात टिकायला हवेत, चमकायला हवेत यासाठी आदिवासी आश्रमशाळा, शिक्षण व्यवस्था ,स्पर्धापरीक्षा अभ्यास केंद्र यांचा विकास होणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.
पालघर जिल्हा मुख्यालयाच्या नियोजन भवनात झालेल्या आढावा बैठकीत प्रत्येक विषयाचा ,योजनेचा सविस्तर आढावा पंडित यांनी घेतला. वन हक्क अधिनियम , रोजगार हमी सारख्या योजना राबवताना येत असलेल्या अडचणी ,धोरणात्मक त्रुटी पंडित यांनी बारकाईने समजून घेतल्या. कुपोषण निर्मूलनाबाबत असलेल्या योजना आणि धोरण याबाबत पंडित यांनी आढावा घेतला. अंगणवाडीत होणाऱ्या पोषण आहार पुरवठ्याबाबत माहिती घेण्यात आली, अंगवाड्यांमध्ये कनेक्टिव्हिटीची समस्या असल्याने रिअल टाइम मॉनेटरिंग होत नसल्याने कुपोषणाची आकडेवारी, सॅम मॅम श्रेणीप्रमाणे तपशील वेळच्या वेळी येत नाही याबाबत दखल घेण्याच्या पंडित यांनी सूचना केल्या.
रोजगार हमीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याबाबत झालेल्या प्रयत्नांमध्ये स्वतः पंडित यांचे मोठे योगदान आहे, त्यामुळे या योजनेतील अडथळे दूर करण्याबाबत काही सूचना पंडित यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. आदिवासी प्रकल्पातील योजना, कृषी विभागाच्या योजनाबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला. जिह्यातील पाणी टंचाई बाबत यावेळी चर्चा झाली, जव्हार मोखाडा सारख्या दुर्गम भागात पाणी टंचाईची समस्या असल्याचे वृत्त गेले काही दिवस येत असल्याचे पंडित यांनी निदर्शनास आणून दिले. जिल्ह्यात पाणी टंचाईवर काय उपाययोजना केली, कुठे पर्यायी टँकर व्यवस्था केली याचाही आढावा घेण्यात आला. ठक्कर बाप्पा योजनेचाही आढावा घेण्यात आला, आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी प्रस्तावित निधीचा विनियोग कसा होतो याबाबत माहिती घेण्यात आली. आश्रमशाळा सुविधांबाबत पंडित यांनी तपशीलवार चर्चा केली. दुरावस्थेबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली. सुधारणेबाबत सूचना करण्यात आल्या.
शिक्षण विभागाच्या आढाव्यात तपशीलवार माहिती पंडित यांनी अधिकाऱ्यांना विचारली. एकही एक शिक्षकी शाळा नको असे धोरण असताना जिल्ह्यात 163 शाळा आजही एक शिक्षकी असल्याचे समोर आले. इयत्तवाढीनंतर वर्ग खोल्यांची त्रुटी समोर आली. याबाबत आढावा घेऊन जिल्हा पातळीवर करता येऊ शकतील आशा उपाययोजना बाबत अधिकाऱ्यांना सुचना केल्या.
यांसह पालघर जिल्ह्यातील सा.बा.विभाग आणि इतर विविध विभागाच्या निधीतून होणारी कामे आणि योजना तसेच समस्यांबाबत आढावा घेऊन बैठकीचा समारोप झाला.विवेक पंडित यांचा सामाजिक क्षेत्रातला अनुभव, प्रशासकीय समज, ज्ञान आणि कल्पक तेवढाच संवेदनशील स्वभाव यामुळे ही बैठक अगदी तपशिलाने आणि दीर्घकाळ चालली, येत्या काळात पालघर जिल्ह्यातील समस्यांबाबत शासन -प्रशासनाकडून नियोजनबद्ध काम होईल अशी अपेक्षा ठेऊन पंडित यांनी आवश्यक त्या सूचना यावेळी केल्या. सामाजिक संस्था आणि संघटना प्रतिनिधी, पत्रकार बांधवांनीही यावेळी विवेक पंडित (राज्यमंत्री) यांच्यासोबत संवाद साधला.
Leave a Reply