आंबेगाव-शिरुर मधील सुमारे दीड हजार सिंचन योजनांचा वीजपुरवठा होणार खंडीत

सजग वेब टिम, आंबेगाव

मंचर | आंबेगाव-शिरुर तालुक्‍यातील सुमारे दीड हजार सिंचन योजनांचा वीजपुरवठा खंडीत होणार आहे. शिरुर शहराला तातडीने पिण्यासाठी पाणी उपलब्ध होण्यासाठी घोडनदी काठावरील उपसा सिंचन योजनांचा वीजपुरवठा 13 ते 16 मे पर्यंत खंडीत करण्यात येणार आहे, अशी माहिती आंबेगाव तालुक्‍याच्या तहसील विभागाने दिली आहे.

कुकडी प्रकल्पांतर्गत उन्हाळी हंगाम 2018-2019मधील पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाबाबत जलसंधारण मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 2 मार्च रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ठरलेल्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांनी पाणी टंचाई या विषयान्वये पुणे जिल्ह्यासाठी पिण्याचे पाणी आरक्षित केलेले आहे. सद्यस्थितीत घोडनदीवर आरक्षित केलेले पिण्याचे पाणी सोडण्यात आले आहे. सोडण्यात आलेले पाणी शेवटच्या बंधाऱ्यापर्यत पोहचण्यासाठी घोडनदी किनाऱ्यावरील दोन्ही बाजूच्या उपसा सिंचन योजनांचा थ्री फेज विद्युतपुरवठा खंडीत करण्याबाबत जलसंपदा विभागाने आंबेगाव तालुक्‍याच्या तहसीलदारांना कळविले आहे.

घोडनदीत सोडण्यात आलेले पाणी जुलैपर्यत जतन करण्याच्या दृष्टीने व पाण्याचा वापर काटकसरीने होण्यासाठी 13 ते 16 मे पर्यत गंगापूर, पिंपळगाव घोडे, गोनवडी, घोडेगाव, चास, नारोडी, वडगाव काशिंबेग, सुलतानपूर, कळंब, चांडोली खुर्द, चांडोली बुद्रुक, पिंपळगाव, खडकी, अवसरी, निरगुडसर, भराडी, टाव्हरेवाडी, जवळे,पारगाव, शिंगवे, काठापूर इत्यादी गावांचा विद्युतपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. सदर गावांतील पिण्याचे पाणी वगळून शेतीसाठी होणारा पाणीपुरवठा उपसा सिंचनाचे विद्युत कनेक्‍शन 16 मे पर्यत खंडीत केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat