आंबेगाव विधानसभेचा शिवसेनेचा उमेदवार कोण? शिरूरच्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष

सजग वेब टीम, आंबेगाव

मंचर : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारी मिळविण्यासाठी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अँड अविनाश रहाणे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सुरेश भोर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जयश्री पलांडे आदी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. शिरूर लोकसभा निवडणूक निकालाच्या गणितावरच आंबेगावचा शिवसेनेचा उमेदवार ठरणार आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची उमेदवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून निश्‍चित आहे.

आंबेगाव विधानसभा मतदारसंघ हा दिलीप वळसे पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या सहा विधानसभा निवडणुका वळसे पाटील यांनी जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक निवडणुकीत मताधिक्‍याची कमान वाढती ठेवण्यात ते यशस्वी ठरले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत आंबेगाव मधून आढळराव यांनी १८ हजार ७०० मताधिक्‍य घेतले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे २०१४ च्या विधानसभा निवड़णुकीत अरुण गिरे यांना विधानसभेला उमेदवारी देवून वळसे पाटील यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न झाला होता.

प्रत्यक्षात निवडणूक निकालात वळसे पाटील ५९ हजार मताधिक्‍याने विजयी झाले. त्यामुळे वळसे पाटील यांच्या विरोधात कोणता तगडा उमेदवार द्यावा याची चर्चा शिवसेनेत सुरु झाली आहेत.

वळसे पाटील यांचा विजय रथ रोखण्यासाठी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत कल्पना आढळराव पाटील यांना उतरविले होते. पण त्यांचाही पराभव झाला होता. वळसे पाटील यांना ३७ हजाराचे मताधिक्‍य मिळाले होते. या उमेदवारा व्यतिरिक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एखादा मोठा कार्यकर्ता गळाला लावण्याची खेळीही शिवसेनेकडून होवू शकते. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा कोणाला ग्रीन सिग्नल मिळणार यावर उमेदवारीचे गणित अवलंबून आहे.

आंबेगाव विधानसभेला शिरूर तालुक्‍यातील ३९ गावे जोडलेली आहेत. तेथील उमेदवार देण्याचा निर्णय झाल्यास जयश्री पलांडे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. अरुण गिरे यांनीही गेली पाच वर्ष मतदारसंघ पिंजून काढला आहे. या निवडणुकीत तेदेखील भक्कम दावेदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालावरच आंबेगाव विधानसभेचा शिवसेनेचा उमेदवार ठरणार आहे. शिवसेनेच्या दृष्टीने लोकसभेला दगा फटका झाला तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याच्या हलचाली मातोश्रीकडून होण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास वळसे पाटील विरुद्ध आढळराव पाटील अशी थेट लढत होवू शकते अशी चर्चा मतदार संघात सुरु आहे.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat