आंबेगाव तालुक्यात महासुविधा केंद्राच्या दिरंगाई ला पालक,विद्यार्थी वैतागले
विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी दाखले मिळेना वेळेत
सजग वेब टिम, आंबेगाव
लोणी-धामणी | आंबेगाव तालुक्यात विद्यार्थ्यांना महासुविधा केंद्र व प्रशासनाकडून विविध शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असे विविध प्रकारचे दाखले मिळताना प्रशासनाच्या आडमुठेपणाला तसेच दिरंगाई ला सामोरे जावे लागत आहे.ज्यामुळे संबंधीत विद्यार्थी व त्यांचे पालक यांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. वेळेत कागदपत्र न मिळाल्याने विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याचा धोका यामुळे निर्माण होऊ शकतो यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख मा.आदित्यजी ठाकरे व कार्यसम्राट मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या विरोधात युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय, व्यवस्थापन, कृषी व इतर विद्या शाखांतील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून सदर प्रवेशप्रक्रियेसाठी विविध प्रकारचे दाखले व प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. आंबेगाव तालुक्यातील बहुतांशी भाग ग्रामीण व दुर्गम असल्याने ह्या भागातील मुलांना दाखले व प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी महासुविधा केंद्रांवर व तहसील कचेरीत वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. दाखले वितरित करण्यासाठी शासनाने विहित मुदत देखील ठरवून दिली आहे. मात्र याचे पालन प्रशासनाकडून केले जात नाही.
सुविधा केंद्रातील विद्यार्थ्यांचे प्राप्त अर्ज केंद्र चालकांकडून वेळेत संगणकावर अपलोड न केल्याने तसेच दाखले मंजूर करण्यासाठी तहसील प्रशासनाकडून विलंब होत असल्याने आंबेगाव तालुक्यातील शेकडो विद्यार्थी विविध शाखांच्या प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांच्या ह्या प्रश्नांवर युवासेनेचे राज्य विस्तारक मा.सचिन बांगर यांच्या नेतृत्वाखालील युवासेनेच्या शिष्टमंडळाने विद्यार्थ्यांसमवेत आज तहसीलदार श्रीमती सुषमा पैकीकरी मॅडम यांची भेट घेऊन युवासेनेच्या वतीने याबाबत निवेदन दिले. विद्यार्थ्यांच्या सर्व अर्जांची लगेच पडताळणी करून सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ दाखले व प्रमाणपत्रे वितरित करण्यात यावीत तसेच एकही विद्यार्थी कागदपत्र व प्रमाणपत्रांअभावी प्रवेशापासून वंचित राहू नये याची खबरदारी तहसील प्रशासनाने घ्यावी अन्यथा युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे यावेळी सचिन बांगर यांनी म्हटले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी देखील आवश्यक दाखले मिळवण्यासाठी मुदतीपूर्वीच अर्ज दाखल करावेत असे आवाहनही युवासेनेच्या वतीने करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे मा.उपतालुकप्रमुख मिलिंद काळे, आंबेगाव तालुका शिवसेना आय.टी. सेल संघटक देविदास आढळराव पाटील, ग्राहक संरक्षक कक्षाचे तालुका अध्यक्ष अमोल काळे, शिवसेना गटप्रमुख धनेश शेवाळे, सुनिल बांगर यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
Leave a Reply