आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागांत रस्त्यांची दुर्दशा

सजग वेब टिम, आंबेगाव ( संतोष पाचपुते)

पारगाव | आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागात लोणी, धामणी, वडगावपीर, मांदळेवाडी, पहाडदरा व इतर काही मोजक्या गावांचा अपवाद वगळता मान्सुन पुर्व,मान्सुन चा पाऊस जोरदार बरसला आहे. मागच्या वर्षीच्या दुष्काळात होरपळून निघालेल्या गावांना अजुनही पावसाने म्हणावा तसा हात दिलेला नाही. पण झालेल्या रिमझीम पावसाने शेतक-यांची पेरणीची कामे मात्र सुरु झाली आहेत.

जारकरवाडी,पारगाव,अवसरी,मेंगडेवाडी या गावांना मात्र पावसाने जोरदारपणे झोडपुन काढले आहे.ही गावे आधीच डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यानजीक अथवा घोडनदी तटावर वसली असल्याने त्यांचा पाण्याचा प्रश्न तुर्तास निकालात निघाला आहे.पण या पावसाने पुर्व भागातल्या रस्त्यांची मात्र पुरती वाट लावली आहे.

आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागातील महत्वाची बाजारपेठ म्हणुन नावारुपाला आलेल्या पारगाव गावातील पारगाव स्टॅन्ड ते शिंगवे-काठापुर चौक हा रस्ता तर अक्षरशः राडा-रोड्याचा चौक बनला आहे.शिंगवे काठापुर चौक या रस्त्यावर चिखलाचे सर्वत्र साम्राज्य पसरले असुन खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हे समीकरण वाहनचालकांना समजुन येत नाही.त्यात हा रस्ता इतर भुभागापेक्षा खोलगट असल्याने आजुबाजुचे सर्व पाणी याच रस्त्यावर येते आणि रस्ता संपुर्ण चिखलात रुतुन जातो. अशीच कदाचीत त्याहुन जास्त दुरावस्था झाली आहे ती जारकरवाडी ते लोणी या रस्त्याची!!

धामणी खिंड ते धामणी फाटा हा अपवाद वगळता हा रस्ता देखील पुर्णपणे पावसात वाहुन गेला आहे.खड्यांचे साम्राज्य तर इतके की रस्ता अक्षरशः शोधावा लागतो आहे.

जारकरवाडी गावाच्या पुढे भोजणदरा वस्ती नजीक च्या छोट्याशा पुलावर तयार झालेले खड्डे दुचाकी चालकांसाठी कपाळमोक्ष करणारे ठरत आहेत. याहून आश्चर्याची बाब म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धामणी फाटा ते लोणी या रस्त्यावरचे खड्डे पावसाळ्यापुर्वी बुजवलेच गेले नाहीयेत. मग या विशेष दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागा ने केलेली आर्थिक डागडुजी खड्ड्यातच मुरली नाही ना?असा सवाल या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालक व्यक्त करत आहेत. तुर्तास तरी आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागातले हे रस्ते म्हणजे वाहनचालकांसाठी अक्षरशः मृत्यूचे सापळेच बनले आहेत.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat