अमोल कोल्हे यांची जुन्नर, भोसरी मध्ये स्वागत सभा, राष्ट्रवादीकडून शक्ती प्रदर्शन
सजग वेब टीम, जुन्नर
जुन्नर : शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे लगेच निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. शिरूर मतदारसंघासाठीचा विधानसभा स्तरीय मेळावा उद्या दुपारी २.०० वा. नारायणगाव याठिकाणी तर सायं. ०५.०० वा. भोसरी याठिकाणी होत असून या मेळाव्यांमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे डॉ कोल्हे यांची शिरूरमधून उमेदवारी जाहीर करतील, असा अंदाज आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अजित पवार आणि धनंजय मुंडे हे जुन्नर आणि भोसरीतील जाहीर मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीतून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले माजी आमदार विलास लांडे यांच्या भोसरी विधानसभा मतदारसंघातूनच किंवा कोल्हे यांच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव च्या मेळाव्यात कोल्हेंच्या नावाची घोषणा होणार आहे असा अंदाज बांधला जात आहे.
शिरूर मतदारसंघ यावेळी कुठल्याही परिस्थितीत पुन्हा ताब्यात घेण्याचा चंग राष्ट्रवादीने बांधलेला आहे. त्यातूनच डॉ कोल्हे यांना तेथून उमेदवारी दिली जाणार आहे. त्याची जंगी घोषणा आणि प्रचाराची धडाक्यात सुरुवात करण्यासाठी पक्षाची सर्वच मातब्बर नेतेमंडळी परिवर्तन यात्रेनंतर प्रथमच पिंपरी चिंचवड शहरात आणि पुणे जिल्ह्यात येत आहेत. त्याकरीता भोसरीतील सर्वात मोठे गावजत्रा मैदान बुक करण्यात आले आहे.
Leave a Reply