अखेर खा. अमोल कोल्हेंंच्या मोठ्या घोषणेचं गुपित उलगडलं
खा.डॉ. अमोल कोल्हे यांच्या किल्ले शिवनेरीवर “शिवसृष्टी” व “रोपवे” , वढू तुळापूर येथे ऐतिहासिक वारसास्थळ “शंभूसृष्टी” निर्मिती करण्याच्या मागणीला केंद्राकडून ग्रीन सिग्नल : खा.डॉ अमोल कोल्हे
अखेर १८ डिसेंबर च्या मोठ्या घोषणेचं उत्तर मिळालं
सजग वेब टिम, महाराष्ट्र
नवी दिल्ली | खा.डॉ अमोल कोल्हे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसृष्टी निर्मितीसह रोप-वे निर्मिती करण्यात यावी तसेच वढू तुळापूर या ठिकाणी शंभूसृष्टी उभारण्यात यावी अशी आग्रही मागणी केली होती. आज त्यांच्या प्रयत्नांना प्रहलाद सिंह पटेल (पर्यटन व सांस्कृतिक मंत्री) यांनी खा.डॉ अमोल कोल्हे यांना लेखी पत्राद्वारे लवकरच या निर्मितीसाठी फंड उपलब्ध करून दिला जाईल असे कळवले आहे.
लोकसभा प्रचारामध्ये अमोल कोल्हे यांनी भक्ती-शक्ती कॅरिडॉर अंतर्गत किल्ले शिवनेरीवर शिवसृष्टीची निर्मिती तसेच शौर्यपीठ वढू तुळपुर येथे शंभुसृष्टी निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. याच आश्वासनाची मागणी दि.१० डिसेंबरच्या संसदीय कामकाजात खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी शून्यप्रहारामध्ये केली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आणि तमाम शिवभक्तांचे शक्तीतीर्थ असणाऱ्या किल्ले शिवनेरी येथे आबालवृद्धांना दर्शन घेता यावे यासाठी रोपवे आणि पायथ्याशी शिवप्रभूंचा पराक्रम आणि महाराष्ट्राची लोकसंस्कृती याचे दर्शन घडवणारी “शिवसृष्टी” उभारण्यास आता लवकरच सुरुवात होईल.
वढू तुळापूर या ठिकाणी “शंभूसृष्टी” हे स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसास्थळ व शौर्यपीठ म्हणून शंभूराजे प्रेमींना इतिहास अनुभवता येईल.
भक्ती-शक्ती कॉरिडोअर निर्मितीमुळे शिरुर लोकसभा मतदारसंघात हजारो रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील व पर्यटनवृद्धी होण्यास निश्चितच फायदा होईल. कोल्हे यांच्या अभ्यासपूर्ण मागणीस केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाने लवकरच यासाठी फंड उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे लेखी पत्राद्वारे कळविले असून या ऐतिहासिक कार्यास लवकरच सुरवात होईल असे कोल्हे यांनी सांगितले आहे.
Leave a Reply