अक्षय बोऱ्हाडे प्रकरणी खा.अमोल कोल्हे यांनी मांडली भूमिका

अक्षय बोऱ्हाडे प्रकरणी खा. अमोल कोल्हे यांनी मांडली भूमिका

सर्वांनी कायद्यावर विश्वास ठेवण्याचे केले आवाहन

सजग वेब टिम, पुणे

पुणे | जुन्नर तालुक्यात शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून बेघर व मनोरुग्णांसाठी सामाजिक कार्य करणार्‍या अक्षय बोर्‍हाडे या तरुणाला काँग्रेसचे युवा नेते सत्यशिल शेरकर यांनी त्यांच्या बंगल्यावर बोलवुन मारहाण केल्याचा आरोप बोर्‍हाडे याने फेसबुक लाईव्हद्वारे केला आहे. त्यावरुन जुन्नर तालुक्यात राजकिय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. काल सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या सामाजिक कार्यकर्ते अक्षय बोऱ्हाडे यांच्या फेसबुक लाईव्ह व्हिडिओवर राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया आल्या आहेत.

या प्रकरणी खा. उदयनराजे भोसले, खा.संभाजीराजे छत्रपती, आ. नितेश राणे यांसह अनेकांनी याविषयी फेसबुक पोस्ट करुन निषेध नोंदवत प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या विषयी शिरूर चे खासदार अमोल कोल्हे काय भूमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. आज खा. अमोल कोल्हे यांनी या प्रकरणी आपली भूमिका मांडली.

त्यांनी मांडलेली भूमिका अशी की,
“काल सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या सामाजिक कार्यकर्ते अक्षय बोऱ्हाडे यांच्या व्हिडिओ वर राज्यातून अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत तसेच बऱ्याच सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन आले. माझी विनंती आहे की नाण्याची एकच बाजू ऐकून मत बनवण्यापेक्षा पोलीस खात्याला त्यांचं काम करू द्यावं. आणि एकच बाजू ऐकून सोशल मीडिया ट्रायल करण्यापेक्षा कायदेशीर मार्गावर विश्वास ठेवावा.
तसेच सत्यशील शेरकर आणि मी, आम्ही दोघेही समाजकारणात येण्यापूर्वीपासून मित्र आहोत आणि तरीही कुणाला पाठीशी घालण्याचा प्रश्न उद्भवत नाही या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मी पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.”

दरम्यान विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनीही काल आपली बाजू माध्यमांसमोर मांडली आहे.

सदर प्रकरणी शेरकर यांनी पत्रकार परिषदेत खुलासा करुन आरोप फेटाळत म्हटले आहे की, कोरोना पार्श्वभुमीवर गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अक्षयने स्वत:ची व रुग्णांची काळजी घेण्याच्या सुचना देण्यासाठी त्याला आम्ही ग्रामस्थांनी बोलवले होते, परंतु आम्ही त्याच्या कामावर आक्षेप घेतोय असा गैरसमज करुन त्याने आम्हाला अरेरावीची भाषा करत शिविगाळ करुन तो निघुन गेला. अक्षयला कोणत्याही प्रकारची मारहाण झालेली नाही, तसे असल्यास त्याने ते सिद्ध करुन पुरावे द्यावेत असेही शेरकर यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी दोन्ही बाजूंनी समर्थक आपल्या बाजू सोशल मीडियावर मांडत आहेत.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat