अक्षय बोऱ्हाडेला आमचा जाहीर पाठिंबा – आढळराव पाटील
अक्षय बोऱ्हाडेला आमचा जाहीर पाठिंबा – आढळराव पाटील
सजग वेब टिम, जुन्नर
जुन्नर | अक्षय बोऱ्हाडे प्रकरणी सोशल मीडियाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहेत. या मुद्द्यावर आता राज्यातील राजकारण पेटू लागले आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, जुन्नर तालुका शिवसेनेचे प्रमुख माऊली खंडागळे, मावळ तालुका युवासेना प्रमुख अनिकेत घुले आदींनी आज बोऱ्हाडे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.
या दरम्यान आढळराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहे की “गेले दोन दिवस मी या घटनेची इतंभूत माहिती घेऊन अक्षय बोऱ्हाडे, सत्यशील शेरकर तसेच पोलीस प्रशासनाशी बोलून सर्व माहिती पडताळली. याप्रकरणी अक्षयची समक्ष भेट घेऊन त्याला पाठिंबा द्यावा यासाठी मला अनेकांनी फोन केले.
या संपूर्ण विषयावर मी अक्षयशी सविस्तर चर्चा केली असून व्यक्तिशः माझ्याकडून व शिवसेना पक्षाकडून काही मदत लागल्यास मी खंबीरपणे उभा आहे असे सांगून अक्षयला आश्वस्त केले आहे. निराधार व मनोरुग्ण व्यक्तींची अक्षय करीत असलेली सेवा मी गेली अनेक वर्षांपासून पहात आहे. त्याच्या या कार्याची दखल घेऊनच गेल्या २ वर्षांपूर्वी मी संस्थापक-अध्यक्ष असलेल्या श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने वार्षिक सभेत ‘श्री भैरवनाथ जीवन गौरव पुरस्काराने’ अक्षयला सन्मानित केले. यापूर्वीदेखील ज्या ज्या वेळी अक्षयला गरज पडली त्या त्या वेळी मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून सहकार्य करायला सांगितले हे अक्षयलाही चांगलेच माहित आहे.
परवा झालेल्या प्रकरणाबद्दल शिवसेना पक्षाचा उपनेता व संपर्कप्रमुख म्हणून शिवसेना पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ता अक्षय बोऱ्हाडे यास पाठिंबा जाहीर करत आहे.”
या दरम्यान सत्यशील शेरकर यांच्यावर काल जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी काल दिले असल्याचे सांगितले आहे. आता या प्रकरणात शिरूर लोकसभा क्षेत्रातील शिवसेनेने उघड भूमिका घेतल्याने या प्रकरणाने आता राजकिय वळण घेतले आहे.
Leave a Reply